News Flash

रहाटेनगर टोलीतील मुलींना पोलीस भरती प्रशिक्षण

काही दिवसांपूर्वी अजनी पोलिसांनी रहाटेनगर टोलीत छापा टाकून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली.

मुलींशी चर्चा करताना पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने.

मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी नागपूर पोलिसांचा प्रयत्न; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची सकारात्मक दखल

मंगेश राऊत

नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वस्ती म्हणून ओळख असलेल्या रहाटेनगर टोलीतील मुलींना पोलीस दलात भरती करून त्यांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी नागपूर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. या परिसरातील होतकरू मुलींना पोलीस विभागामार्फत भरतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी अजनी पोलिसांनी रहाटेनगर टोलीत छापा टाकून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईचा विरोध करीत रहाटेनगर टोलीतील पुरुष व महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे वस्तीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी पोलिसांनी जवळपास ४०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावून १०० वर लोकांची धरपकड केली.

या वस्तीत राहणाऱ्या अनेक महिला व पुरुष चोरी, अवैध दारू विकतात. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हेही दाखल आहेत. तसेच या भागातील लोकांना जुगार व मटका लावण्याचेही व्यसन आहे. मुलेही भीक मागण्याचे किंवा कचरा वेचण्याचे काम करतात. या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेद्वारा प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याशिवाय या परिसराची गुन्हेगारी वस्ती ही प्रतिमा पुसण्यासाठी या संस्थेचे संस्थापक खुशाल ढाक हे शहरातील काही प्रतिष्ठित लोकांच्या मदतीने येथील तरुणींना मुखपट्टी निर्मितीचा गृहउद्योग सुरू करून देण्यासाठी मदत करीत आहेत. यासंदर्भात लोकसत्ताने ‘गुन्हेगारी प्रतिमा बदलण्यासाठी गृहउद्योग’ ही बातमी १ जूनला प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल पोलीस विभागाकडून घेण्यात आली. या तरुणींपैकी पात्र तरुणींना पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता आज सोमवारी पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सर्व मुलींना गुन्हे शाखेत बोलावून त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्यांचे शिक्षण व उंची जाणून घेऊन पात्र मुलींना पोलीस दलाकडून भरतीचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच शारीरिक व लेखी परीक्षेची तयारी करवून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. परिसरातील पात्र मुलींची नोंदणी करण्याचे काम सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खुशाल ढाक यांना देण्यात आले आहे.

‘मास्टर’ देणार प्रशिक्षण

पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची कवायत करवून घेणाऱ्या मास्टरकडून या मुलींना भरतीचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय शारीरिक क्षमतेसाठी तयार झाल्यानंतर मुलींना लेखी परीक्षा उत्तीर्ण होता यावे म्हणून त्याचेही धडे दिले जातील. यामुळे परिसरातील मुली पोलीस दलात भरती झाल्यास त्यांच्या आई-वडिलांनी व नागरिकांनी गुन्हेगारीचे काम सोडून मुख्य प्रवाहाशी जुडावे यासाठी हे प्रयत्न आहेत.

– गजानन शिवलिंग राजमाने, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:29 am

Web Title: police recruitment training girls rajajinagar team ssh 93
Next Stories
1 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे हाल
2 तिसरी लाट थोपवण्यासाठी आत्मनिर्भरतेवर भर
3 मुलांचे प्रवेश रद्द करताच पालक उच्च न्यायालयात
Just Now!
X