एकाच गुन्ह्य़ात अनेकदा पैसे उकळले

नागपूर : भूखंडावरील अतिक्रमण काढून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने एकाकडून एक लाख रुपयाची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अजनी पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला आज बुधवारी रंगेहात पकडले.

राजेशसिंग केशवसिंग ठाकूर (वय ५६, रा. शांतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार  रेल्वेत पार्सल कंत्राटदार आहेत. त्याचा बोरकरनगर भागात भूखंड आहे. या भूखंडावर भंगारविक्रेता गोपालसिंग याने अतिक्रमण केले आहे. यावरून तक्रारदार व गोपालसिंग या दोघांमध्ये वाद सुरू आहे. गोपालसिंग याच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाचा तपास ठाकूर यांच्याकडे आहे. या प्रकरणाचा तपास करताना ठाकूर यांनी तक्रारदाराला अटक केली होती. यादरम्यान ठाकूरने त्यांना अटक न करण्यासाठी, जामीन देण्यासाठी पैसे मागितले. पैसे देऊन बेजार झाल्यानंतरही ठाकूर पुन्हा तक्रारदाराला भूखंड रिकामे करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागत होता. एवढी रक्कम देण्यास तक्रारदाराने असमर्थता दर्शवल्याने एक लाख रुपये दे, असे ठाकूर तक्रारदाराला म्हणाला. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार  दिली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या महिला निरीक्षक योगिता चाफले, मोनाली चौधरी, रविकांत डहाट, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, अस्मिता मेश्राम, वकील शेख यांनी शताब्दी चौकात सापळा रचला व लाच घेताच  ठाकूरला पकडले.  रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेण्यात येत होती.

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिकही अडकला

वेतनाचे प्रपत्र मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले. उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (वय ५२, रा. बालाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्य़ातील असून नंदपा येथील प्रांजली माध्यमिक विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत. ही शाळा पूर्वी विनाअनुदानित होती. १ जुलै २०१६ ला शाळेला २० टक्के अनुदान मंजूर झाले. त्यानुसार मुख्याध्यापकांनी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रपत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठवले. हे  प्रपत्र मंजूर करण्यासाठी आरोपी त्यांना ५० हजार रुपयांची लाच मागत होता. याची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली. एसीबीने सापळा रचून आरोपीला  अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री  करण्यात आली. कार्यालयातून सुटी घेतली असतानाही आरोपी मंगळवारी कार्यालयात आला होता. पण, तक्रारदारांना उशीर झाल्याने त्याने तक्रारदाराला घराजवळ बोलावून घेतले होते.