News Flash

हवालाचे पैसे लुटणारे पोलिसांचे खबरे

कारवाईतील पैसे लुटण्याचा आरोप काही पोलिसांवरही करण्यात आला.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

नागपूर : अडीच ते तीन कोटी रुपये घेऊन पसार झाल्याचा संशय असलेल्या चौघांना अटक करण्यात सातारा पोलिसांच्या मदतीने नागपूर पोलिसांना यश आले आहे. मात्र, यातील आरोपी हे पोलिसांचे खबरे म्हणूनही काम करीत होत आणि त्यांच्याजवळ आता केवळ २ लाख ८२ हजार रुपये सापडले आहेत. त्यामुळे कोटय़वधी रुपये गेले कुठे, याचा तपास पोलीस करीत आहे. दरम्यान कारवाईतील पैसे लुटण्याचा आरोप काही पोलिसांवरही करण्यात आला.

छत्तीसगडमधील रायपूर येथून नागपुरात एमएच-३१, एफए-४६११ क्रमांकाच्या कारमधून हवालाची कोटय़वधींची रोकड  येत असल्याची  माहिती  नंदनवन पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर नंदवनचे दुय्यम निरीक्षक  सोनुले आणि सहाय्यक निरीक्षक सोनवणे  यांनी पारडी मार्गावरील प्रजापती चौकात रविवार, २९ एप्रिलच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास सापळा रचून कारला थांबवले. कारमध्ये राजेश वामनराव मेंढे (४०) रा. मिनीमातानगर, कळमना आणि नवनीत गुलाबचंद जैन (२९) रा. शांतीनगर, तुलसीनगर हे होते. त्यांनी ती कार वर्धमाननगरातील प्रशांत केसानी नामक व्यापाऱ्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी केसानीला भ्रमणध्वनी करून विचारणा केली. तसेच त्याला नंदनवन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. केसानीने याप्रसंगी पोलिसांशी बोलण्यास टाळाटाळ केली. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्या ठिकाणी तीन कोटी १८ लाख ७ हजार २००  रुपये रोख  सापडली.

मात्र, रायपूर येथील मॅपल ज्वेलरी प्रा. लि. कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार गाडीत त्यापेक्षा अधिक पैसे होते व गाडीतून अडीच कोटी रुपये पोलिसांनी पळवल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि संभाजी कदम यांनी प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली असता सचिन पडगिलवार व रवि मोचेवार यांनीच पोलिसांनी ती माहिती पुरवली होती.

त्यानंतर पोलिसांसोबत ते पैसे घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. मात्र, त्या ठिकाणचे अडीच कोटी रुपये लंपास केल्याची तक्रार करण्यात आली. दरम्यान सचिन व रवि हे आपल्या साथीदारांसह पळून गेले. त्यानंतर सातारा पोलिसांनी महाबळेश्वरजवळ सचिन व रविसह चौघांना एमएच-४९, यु-०७५४ क्रमांकाच्या कारमध्ये पकडले. त्यांना घेऊन नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस निघाले असून पहाटे शहरात दाखल होतील, अशी माहिती गुन्हे शाखा उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:28 am

Web Title: police tipper robbed hawala money
Next Stories
1 उपराजधानीत वीजचोरीची नवी शक्कल
2 लोकजागर : एका दुर्दैवी प्रशिक्षण केंद्राची गोष्ट!
3 यूटय़ुबवर ‘शार्प एमर्स’ चलचित्रफितीची धूम
Just Now!
X