डॉक्टर्स, प्राचार्यांसाठी तारांकित हॉटेल्स, इतर पदवीधरांसाठी मंगल कार्यालय

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. स्पर्धेतील राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदवीधरांच्या विविघ गटांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. मात्र त्या घेताना चार्टर्ड अकाऊन्टन्ट, डॉक्टर्स, प्राचार्यांच्या बैठका तारांकित हॉटेल्समध्ये तर इतर पदवीधरांच्या बैठका मंगल कार्यालय व सभागृहात घेण्यात आल्या. या वर्गवारीमुळे पदवीधरांमध्ये नाराजीचे सूर आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एक डिसेंबरला मतदान होणार असून त्यात भाजप, काँग्रेसच्या उमेदवरांसह एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक पदवीधरांची असली तरी भाजप व काँग्रेसमुळे तिला पूर्णपणे राजकीय रंग चढला असून सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे व्यूहरचना केली जात आहे. पारंपरिक बालेकिल्ला कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर परिवर्तन घडवायचेच या जिद्दीने काँग्रेस रिंगणात उतरली आहे. त्यामुळे इतर सबळ उमेदवारांच्या नावाची चर्चाही मर्यादित स्वरूपातच होताना दिसते.

प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेस, भाजपने पदवीधरांमधील सी.ए. डॉक्टर्स, प्राचार्य, प्राध्यापकांसह इतरही व्यावसायिक पदवीधरांच्या संघटनेच्या स्वतंत्र बैठकांचे सत्र आरंभले आहे. मागच्या आठवड्यात भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस अनेक बैठका घेतल्या. यापैकी डॉक्टर्स, सी.ए.च्या बैठका तारांकित हॉटेल्समध्ये तर  इतर काही बैठका सभागृहात, मंगलकार्यालयात पार पडल्या. या बैठकीतील स्नेहभोजनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यातून वर्गवारीचा मुद्दा पुढे आला असून ज्यांच्या बैठका हॉटेल्समध्ये झाल्या नाही त्यातील काही पदवीधर खासगीत नापसंती व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात भाजपच्या काही नेत्यांशी चर्चा केली असता सर्वच बैठका एकाच ठिकाणी घेणे शक्य नाही, करोनामुळे जागेची उपलब्धताही महत्त्वाची आहे. गर्दी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही अपक्ष  उमेदवारांनी या भोजन बैठकांवर आक्षेप घेतला आहे. यापैकी एक उमेदवार राजेंद्र भुतडा यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. निवडणूक आचारसंहितेचा हा भंग आहे, असे ते म्हणाले.

मतदारांचे दूरध्वनी क्रमांक राजकीय पक्षांकडे कसे?

राजकीय पक्षाकडे मतदारांचे दूरध्वनी क्रमांक, त्यांच्या मतदार केंद्राचे नाव आले कोठून? ही गोपनीय माहिती बाहेर आली कशी, असा सवाल अपक्ष उमेदवार राजेंद्र भुतडा यांनी केला असून याबाबत निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजप, काँग्रेसकडून मतदारांना दूरध्वनीवरून संपर्क साधला जातो, एसएमएस किंवा व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती दिली जात आहे. हे निवडणूक संकेताच्या विरुद्ध आहे, असा आरोप भुतडा  यांनी केला.