मतदार नोंदणीची मुदत वाढवण्याची काँग्रेसची मागणी

विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर  विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर लक्ष केंद्रीत झाल्याचे दिसून येते. यासाठी मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे यांनी मतदार नोंदणी मुदत ३१ जानेवारी करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलै २०२० मध्ये आहे. या मतदारसंघात नागपूर विभागातील पदवीधरांचे मतदार यादीत नाव नोंदवण्याकरिता १ ऑक्टोबर २०१९ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर २५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत या मतदार नोंदणीच्या प्रक्रियेत दुसरे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ऑक्टोबर महिन्यात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व्यस्त होते. त्यामुळे पदवीधर मतदारसंघात मतदारांची फारशी नोंदणी झालेली नाही. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू झाल्या. त्यामुळे सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद होती. अजूनही काही शाळा, महाविद्यालय, संस्थांना सुटी आहे. या सर्व संबंधित लोकांची नोंदणी करणे शक्य झाले नाही. शिक्षण क्षेत्रात शाळा व महाविद्यालयाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर पदवीधरची नोंदणी केली जाते. यामुळे ६ नोव्हेंबपर्यंतची मुदत मतदार नोंदणीसाठी अपुरी आहे. विभागातील लाखो पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे मतदार नोंदणीचा कार्यक्रम ३१ जानेवारी २०२० पर्यंत वाढवण्यात यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघ, नागपूर शहराध्यक्ष विक्रांत मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मतदारनोंदणीची मुदत वाढण्याची विनंती केली.