सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू

नागपूर : खुल्या प्रवर्गातील बेरोजगार व गरीब  तरुणांना रोजगार न मिळाल्यास बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारे पत्रक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरातील बसस्थानकावर चिटकवण्यामागे एका राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. पण, पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्नात असताना दुसरीकडे पोलिसांवर प्रकरण दडपण्यासाठी दबाव येत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितली.

सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरातील बसस्थानकाच्या भिंतीवर ही धमकी पत्रके लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या पत्रकात खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकरी न दिल्यास बॉम्बस्फोट घडवू, अनेक कुटुंबांना बॉम्बने उडवून टाकू, आमच्याकडे शार्प शूटर आणि हल्लेखोर आहेत. त्यांच्याकरवी हल्ला करू, असा इशारा देण्यात आला आहे. या पत्रकामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच अंबाझरी आणि सीताबर्डी पोलीस बसस्थानकावर पोहचले. त्यांनी भिंतीवरील धमकीचे पत्र काढले. याबाबत पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.