अवैध धंद्यांवर गदा आल्याने जिल्हा प्रशासनावर दबाव

कोका अभयारण्यातील जड वाहतुकीचा फटका अभयारण्यातील वन्यप्राण्यांना बसल्याने या मार्गावरील वाहतूक सायंकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. हा निर्णय वन्यप्राण्यांच्या हितासाठी असला तरीही यामुळे अवैध धंद्यांवर गदा आली आहे. परिणामी, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हाताशी धरून हे मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अभयारण्य व जिल्हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

कोका अभयारण्यातून भंडारा ते करडी (पलाडी मार्गे) हा १२ किलोमीटरचा रस्ता, भंडारा ते करडी (सालेहेटी मार्गे) हा १.५४ किलोमीटरचा तर तुमसर-साकोली हा सहा किलोमीटरचा रस्ता जातो. हे तीनही रस्ते अतिशय वर्दळीचे आहेत. या मार्गावरून मध्यरात्री अवैध रेती, गिट्टी, मुरुम भरलेल्या ट्रकची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने वन्यजीवांच्या भ्रमंतीला अडथळा निर्माण होत होता. त्यातूनच अभयारण्य प्रशासनाने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून हे तिन्ही रस्ते रात्रीच्यावेळी बंद करण्याची विनंती केली.

जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून या तिन्ही मार्गावरील वाहतूक सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद केली. यातून स्थानिक गावकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने  यांनाही सवलत देण्यात आली आहे. अभयारण्यातून जाणाऱ्या या रस्त्यांचा वापर करुन वैनगंगा नदीतून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा होतो.

अभयारण्य प्रशासनाच्या विनंतीनंतर हा मार्ग बंद केल्याने या अवैध धंद्यावरही चाप बसला आहे. तसेच गाभा क्षेत्रातील एका गावातील अवैध ढाब्यावर दारू पिऊन येणाऱ्या व अभयारण्यात अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या पर्यटकांवरही आळा घातला गेला आहे. मात्र, आता या लोकांनीच राजकीय नेत्यांशी जवळीक साधून बंद करण्यात आलेला रस्ता सुरू करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यतील राजकीय नेतृत्त्व वन्यजीवांना जीवदान देणार की मतांचे राजकारण करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मार्च २०१९ पासून वनखात्याचा अभ्यास

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात १००.१४ किलोमीटरचे हे अभयारण्य आहे. या अभयारण्यात वाघ, वाघीण आणि तीन बछडे आहेत. जंगलात बिबट, अस्वल आणि इतरही प्राणी आहेत. या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मार्च २०१९ पासून वनखात्याने अभ्यास सुरू केला होता.

वाहतूक बंदीचे अनुभव सकारात्मक

२०१५ मध्ये बुलढाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात राज्य महामार्ग २४ वर रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान वाहतूक बंद करण्यात आली होती.  २०१८ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यत विशाळगड ते आंबा हा २१ किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याचे सकारात्मक परिणाम त्यावेळी दिसून आले.

ताडोबा व्यवस्थापनाच्या निर्णयाने ‘जिप्सी’ चालकांमध्ये असंतोष

चंद्रपूर : वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्यांच्या ८ जिप्सी गाडय़ा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास कोलारा प्रवेशद्वारासमोर अडवून धरल्याने एकच गोंधळ उडाला. या गोंधळामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वन जमिनीवरील अतिक्रमण सोडा, त्यानंतरच या गाडय़ा चालवा, अशी भूमिका ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी घेतली  आहे. त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष कोलारा सोबतच ताडोबाच्या इतरही प्रवेशद्वारावर बघायला मिळणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात स्थानिक ग्रामस्थांच्या जिप्सी गाडय़ा आहेत. मात्र यातील काहींनी वनजमिनीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे.  जोवर वनजमिनीवरील अतिक्रमण सोडणार नाही, तोवर गाडय़ा  चालवू देणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यातूनच आज  ८ जिप्सी गाडय़ा  अडवण्यात आल्या. या सर्व गाडय़ांमध्ये पर्यटक होते. यामुळे गाडी चालकांनी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.