राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नथुरामाचे महात्म्य सांगणाऱ्या नाटकांच्या प्रयोगात वाढ होणे हा प्रकार उजव्या विचारसरणीच्या गोबल्स प्रचारतंत्राचा एक भाग आहे. गांधी आम्हाला प्रात:स्मरणीय आहेत, असे एकीकडे उघडपणे सांगणारी ही विचारधारा दुसरीकडे पडद्याआडून नथुरामाची कृती कशी योग्य होती, हे सांगणाऱ्या कलेला प्रोत्साहन देत असते, ही बाब आता लपून राहिलेली नाही. उपराजधानीत नथुरामाच्या नाटकावरून जो गोंधळ झाला, त्यात नाटय़ कलावंतांच्या बचावासाठी ही उजवी विचारधारा अजिबात समोर आली नाही. हाही त्यांच्या प्रचारतंत्राचाच एक भाग. मात्र, हे नाटक या विचारधारेच्या जन्मभूमीत व्हावे, यासाठी आटापिटा करणारी मंडळी सुद्धा उजवीच होती. राज्यात पहिल्यांदा १९९५ ला ही विचारधारा सत्तेत आली आणि नथुरामाच्या उदात्तीकरणाचे प्रयोग सुरू झाले. नंतर सत्ता जाताच हे उदात्तीकरण एकदम थांबले. या नाटकात काम करणाऱ्या कलावंतांना नंतर त्याचे प्रयोग लावण्याची हिंमत झाली नाही. आता पुन्हा सत्ता येताच हे उदात्तीकरण जोरात सुरू झाले आहे.

या नाटकात नथुराम साकारणाऱ्या शरद पोंक्षेंना सत्ता येताच या नाटकाचे प्रयोग करण्याची स्फूर्ती का येते?, हा प्रश्न कुणीतरी विचारायलाच हवा. आम्ही कलाकार आहोत, याकडे नाटय़कृती म्हणून बघा, असे सांगत साळसूदपणाचा आव आणणारे हे लोक या उदात्तीकरणामागचा मूळ हेतू चाणाक्षपणे दडवून ठेवत असतात. हे कलाकार या हेतूविषयी बोलत नसले तरी सामान्य जनतेला मात्र तो कळलेला आहे. म्हणूनच नथुरामाचे हे असत्यकथन बघायला केवळ शंभर प्रेक्षक आले. नाटय़गृहातील रिकाम्या खुच्र्यानी उजव्यांच्या या प्रचारतंत्राचा पुरता पराभव केला. प्रेक्षकच नसल्याने दुसऱ्या दिवशीचा प्रयोग रद्द करण्याची पाळी आयोजकांवर आली. विदर्भात काही ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले, पण त्यालाही फार प्रेक्षक नव्हते. सामान्य लोकांच्या मनातून गांधी पुसून टाकणे एवढे सोपे काम नाही, हे आतातरी या विचारधारेने लक्षात घेणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटक त्याच्या सोयीनुसार गांधीविचार आचरणात आणत असतो, इतका तो व्यापक आहे. त्यासाठी त्याला वेगळे सांगावे लागत नाही. तेलंगणच्या सीमेवर असलेल्या माणिकगड पहाडावरील अशिक्षित आदिवासी वर्गणी गोळा करून गांधींचाच पुतळा बसवतात, दुसऱ्या कुणाचा नाही. गडचिरोलीतील उडेरा गावातील माडिया हे अतिमागास आदिवासी नक्षलवाद्यांनी स्फोटात उडवलेल्या शाळा व ग्रामपंचायतीची पुन्हा उभारणी करण्यापेक्षा नक्षल्यांनी विद्रूप केलेल्या गांधी पुतळ्याच्या पुनस्र्थापनेला प्राधान्य देतात, त्यासाठी घरातील तांदूळ विकतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत गांधी हा असा अनेकांच्या मनामनात विराजमान झालेला आहे. नथुरामाच्या निमित्ताने गांधींचा अपप्रचार करणारे लोक नेमके हेच वास्तव ध्यानात घेत नाहीत. मुळात अशा नाटकांना विरोधच करायला नको. विरोध करून मोठेपण बहाल करणे म्हणजे, उजव्यांच्या प्रचारतंत्राचा एकप्रकारे विजयच आहे, हे विरोध करणारे लोक सुद्धा ध्यानात घेत नाहीत. शेवटी काही गोष्टी अनुल्लेखानेच मारायच्या असतात.

येथील नाटकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या विरोध करणाऱ्यांना तरी गांधी कळले आहेत का?, हा प्रश्न यास्थानी महत्त्वाचा आहे. किमान राज्यात तरी हे नथुरामायण गेल्या अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक सुरू आहे. अनेक अभ्यासकांनी पुस्तके व लेख लिहून त्यातील फोलपणा उघडकीस आणला आहे. मात्र, एकाही नाटय़लेखकाला गांधींवर एक नाटक लिहावेसे वाटले नाही. या अपप्रचाराला नाटक हेच योग्य उत्तर ठरू शकते. नथुरामाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला सुद्धा असे एखादे नाटक लिहून द्यावे व त्याचे प्रयोग करून या उजव्यांच्या ढोंगगिरीला सडेतोड उत्तर द्यावे, असे आजवर वाटले नाही. केवळ फायद्यासाठी गांधींचे नाव वापरणे ही आजकाल फॅशन झाली आहे. त्याला काँग्रेसच काय, कोणताही पक्ष अपवाद नाही. अगदी उजवी विचारधारा जोपासणारे पक्षही गांधींचे नाव घेतातच की! १९४८ ला अंगावर उडालेले रक्ताचे डाग अजूनही पुसले गेले नाहीत, हे उजव्यांचे खरे दुखणे आहे. त्यासाठीच हे दुहेरी चालीचे प्रचारतंत्र अधूनमधून अंमलात आणले जाते, पण सामान्य लोकांच्या मनात हा अपप्रचार अजूनही मूळ धरत नाही.

नाटकाच्या वेळी झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी लावलेल्या गोळीबाराच्या फलकावरून बराच गहजब झाला. काँग्रेसच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांना जनरल डायरची उपमा देऊन हिणवले. आजवर निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलीस ध्वनिक्षेपकावरून सूचना द्यायचे. आता तसे न करता फलक वापरा, अशा सूचना आल्याचे पोलीस सांगतात. मात्र, या नव्या सूचनेची सुरुवात गांधींच्या मुद्यावरून सुरू झालेल्या आंदोलनापासून करून पोलीस स्वत:ची पत गमावून बसले. ‘चले जाव’चा नारा ज्या महात्म्याने दिला त्याच महात्म्याच्या विचाराचे विद्रूपीकरण थांबावे म्हणून आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी चले जाव म्हणणे मूर्खपणाचे लक्षण ठरते. कायदा राबवणाऱ्या या यंत्रणेने निष्पक्ष असले पाहिजे, अशी अनेकांची धारणा असली तरी ही यंत्रणा कायम सत्तेच्या वळचणीलाच बांधलेली असते, हे लखलखते वास्तव आहे. त्यामुळे या फलकामागे सत्ताधाऱ्यांची फूस नसेलच, असे ठामपणे म्हणता येणार नाही. वास्तवात या नाटकाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त नव्हती. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण मिळण्याची शक्यताही नव्हती. नाटकाचा प्रयोग बंद पाडणे हाच त्यामागील हेतू होता. एवढय़ा मर्यादित आंदोलनात थेट गोळीबाराचा फलक दाखवण्याचा प्रकार राजनिष्ठा सिद्ध करण्यासारखाच होता. अतिशय संयमी, प्रदीर्घ काळ सेवेत राहूनही अहंच्या बाधेपासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवणारे पोलीस आयुक्त व्यंकटेशम् यांच्या कार्यकाळात असा प्रकार घडणे योग्य नव्हते. बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत नथुराम विरुद्ध गांधी ही लढाई भविष्यातही सुरूच राहणार, यात शंका नाही. प्रचारतंत्राचा वापर करत खेळली जाणारी ही लढाई जसजशी समोर जाईल तसतसे गांधी विचारांचे नवे अर्थ लोकांना कळत जातील आणि नथुरामाच्या विकृतीचे धगधगीत वास्तव आणखी समोर येत राहील, हाच यातील निष्कर्ष राहणार आहे.

devendra.gawande@expressindia.com