प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकारी हेमा देशपांडे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

प्रदूषण मर्यादित असेल तर खबरदारीच्या उपाययोजनांद्वारे ते नियंत्रित करता येते. मात्र, मर्यादेच्या पलीकडे गेले तर त्या प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवतात. कोणत्याही क्रियेतून प्रदूषके निघतातच. त्याचे प्रदूषणात रुपांतर होऊ नये म्हणून नियम अतिशय चांगले आहेत, पण ते पाळले गेले पहिजे. नियमानुसार कामे झाली तर प्रदूषके प्रदूषणात रुपांतरीत होणार नाहीत, असे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकारी हेमा देशपांडे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी प्रदूषणाच्या विविध मुद्यांना स्पर्श केला. उपराजधानीच्या बाबतीत गेल्या काही वर्षांत हवा प्रदूषित होत असल्याचे समोर येत आहे. मूळात शहराची हवा प्रदूषित नाही तर शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विशेषकरुन बांधकामांमुळे हवेत प्रदूषण वाढत आहे. त्यावर खबरदारीच्या उपाययोजना केल्या तर ते देखील प्रदूषण होणार नाही. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी हरित पट्टे आवश्यक आहेत. या हरितपट्ट्यांबद्दल कुणी बोलायलाच तयार नाही. नगररचनेत या सर्व गोष्टी नमूद असतात. कोणत्याही इमारतींना परवानगी देताना रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, कचरा निर्मूलनाची व्यवस्था आणि सोबतच झाडे या सर्व गोष्टी पाहिल्या जातात, पण त्या पाळल्या जात नाहीत. अशावेळी प्रदूषणाचा फटका बसणारच!  हवेतील प्रदूषणाचे गांभीर्य आजपर्यंत जाणवत नव्हते. आता सगळीकडेच हवा प्रदूषित होत आहे. हवेच्या प्रदूषणातील कार्बन या घटकाला शोषून घेत प्राणवायू देणारी झाडे आपल्याकडे फारच कमी आहेत. हिवाळ्यात हवेतील प्रदूषणात वाढ दिसून येते. कारण या ऋतुमध्ये वातावरणातील वरची पातळी थंड असते. त्यामुळे हवा वर जाऊन पसरू शकत नाही. परिणामी अतिसुक्ष्म धुलीकणांचे प्रमाण वाढलेले असते. वाहनांमुळेही हवेतील प्रदूषणात भर पडत आहे. वाहनांची गर्दी होत असेल तर अशा ठिकाणी रस्ते मोठे हवे. चौकाचौकात फवारे हवे. या सर्व गोष्टी हवा कृती आराखडय़ात नमूद आहेत. हळूहळू त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. प्रदूषणासाठी अनेक लहानलहान गोष्टी कारणीभूत ठरतात, ज्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. वाहनांच्या सव्‍‌र्हिसिंग केंद्रातून वाहनांमधील ऑईल बदलताना ते कुठे टाकले जाते, हे पाहिले जात नाही. रोपे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या नष्ट होणाऱ्या आहेत किंवा नाही, हे देखील पाहिले जात नाही. त्यामुळे अशा छोटय़ाछोटय़ा गोष्टींकडे लक्ष दिले तर प्रदूषणासाठी कारणीभूत अनेक घटक कमी करता येतील, असे हेमा देशपांडे यांनी सांगितले.

१७ शहरांसाठी ‘हवा कृती आराखडा’

राष्ट्रीय हरित लवादने दिलेल्या आदेशानुसार भारतातील काही शहरांना हवा कृती आराखडा तयार करायचा आहे. महाराष्ट्रातील १७ शहरांचा यात समावेश होता. त्यात आणखी काही शहरे जोडण्यात आली आहेत. त्यापैकी नागपूर शहराचा हवा कृती आराखडा ‘नीरी’च्या सहकार्याने तयार होऊन मंजूर झाला आहे. टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याची सुरुवात झाली आहे.

एसटीपी हा उत्तम पर्याय

पाण्यातील प्रदूषण दूर करण्यासाठी मलनि:सारण प्लान्ट(एसटीपी) लावणे आवश्यक आहे. शहरात नागनदी, पिवळी नदीचे पाणी काही टप्प्यात चांगले तर काही टप्प्यात वाईट आहे. अंबाझरी  ते अंबाझरी दहनघाटपर्यंत पाणी स्वच्छ आणि त्यापुढे वाईट आहे. अशावेळी एसटीपी हा एक पर्याय आहे.

सर्व फटाके ध्वनी प्रदूषण मर्यादेच्या आत

फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणबाबत मंडळाकडून दिवाळीपूर्वीच फटाक्यांची चाचणी केली जाते. गोंडखरी येथे फटाक्यांच्या चाचणी करण्यासाठी असलेल्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही विविध विभागाच्या सहाय्याने चाचणी केली. विशेष म्हणजे, यावेळी सर्व फटाके ध्वनी प्रदूषण मर्यादेच्या आत निघाले.

प्लास्टिकचे उद्योग बंद केले

प्लास्टिक निर्मूलनाचा शासन आदेश निघाल्यानंतर कॅरिबॅग तयार करणारे प्लास्टिकचे उद्योग आम्ही बंद केले.  शहरात आता त्याचे उत्पादन होत नाही. त्यानंतरही बाजारात प्लास्टिक पिशव्या दिसून आल्या तर त्यावर देखील मंडळ आणि महानगरपालिका कारवाई करत आहे.