हवा गुणवत्ता निर्देशांक ५०-६० वरून  ९०-१०० वर पोहोचला

नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू के लेल्या टाळेबंदीत शिथिलता आल्याबरोबर शहरातील प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. पहिल्या टाळेबंदीत प्रदूषणात कमालीची घट झाली होती. मात्र, टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात प्रदूषण पुन्हा झपाटय़ाने वाढले आहे.

टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्याचे सर्वानीच काटेकोरपणे पालन के ले. रस्त्यावरील वाहतूक जवळजवळ बंद झाली होती. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा आलेख बराच खाली आला होता.  आता टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर के लेल्या आकडेवारीनुसार प्रदूषणाचा आलेख आता पुन्हा वाढणार आहे. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक पीएम २.५, पीएम १०, कार्बन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारख्या आठ मापदंडावर मोजले जाते. पीएम २.५ आणि पीएम १० वगळता इतर मापदंडात फारसा बदल दिसून येत नाही. ही दोन्ही प्रदूषके  शहरातील प्रदूषणाच्या पातळीत बदल करण्यात मोठी भूमिका बजावतात. शहरातील वर्दळ पुन्हा एकदा वाढू लागल्यानंतर या प्रदूषकांमध्येही वाढ होत आहे. शहरातील वाहतूक बऱ्याचअंशी सुरू झाल्यानंतर हवा गुणवत्ता निर्देशांक ५०-६० वरून  ९०-१००च्या दरम्यान गेला. टाळेबंदी पूर्णपणे संपल्यानंतर तो पुन्हा एकदा १५०-१६० या नियमित निर्देशांकावर जाईल. बरेचदा हा निर्देशांक शहरात २००च्या आसपासही गेला आहे. हवेतील प्रदूषणासाठी प्रामुख्याने वाहनांसोबतच, बांधकाम, रस्ते आणि इतर विकासकामे कारणीभूत

ठरतात. या कामातून वातावरणात पसरणारे अतिसूक्ष्मकण, वाहनातून बाहेर पडणारे विषारी वायूप्रदूषणात वाढ करतात. सलग दोन महिने प्रदूषणमुक्त वातावरणात राहिल्याने अस्थमा, हृदयरोग यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे.