धार्मिक स्थळे बंद असल्याचा फटका; व्यवसायावर ७० टक्के परिणाम
नागपूर : करोनामुळे धार्मिक स्थळे बंद असल्याने पूजा साहित्यासह अगरबत्ती, धूप विक्रेत्यांची आíथक कोंडी झाली आहे. टाळेबंदीमध्ये तीन महिने दुकाने बंद होती. यामुळे मोठे धार्मिक सण हातातून गेले. अजूनही सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने पूजा साहित्याच्या बाजारातील ७० टक्के उलाढाल प्रभावित झाली आहे.
उपराजधानीत सर्व धर्माचे सण-उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. हे सण साजरे करताना त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची कोटय़वधी रुपयांची उलाढाल बाजारात होत असते. परंतु करोनामुळे गर्दी होणारे सण साजरे करण्यावर निर्बंध आणल्याने या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीला खीळ बसली आहे. धार्मिक सणही करोनाच्या कचाटय़ात सापडल्याचे चित्र आहे. परिणामी पूजेच्या साहित्याच्या बाजारात तब्बल ७० टक्के उलाढाल प्रभावित झाली आहे. दरवर्षी अगरबत्तीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कच्चा माल आणि करोनामुळे कारखान्यात कर्मचाऱ्यांवर मर्यादा असल्याने अगरबत्तीचे उत्पादन मर्यादित झाले आहे. त्यामुळे १० टक्क्यांनी अगरबत्तीचे भाव वाढले आहे. त्याशिवाय धूप, फुलांच्या माळा, देवपाट, देवांची वस्त्रे, कापूर, चंदन, अत्तर, देवाचे मुकूट, तांब्याची भांडी, घंटी, गंगाजल, गुलाब पाणी, पितळाचे दिवे, जल कलश, लाल कापड आदी साहित्यांची बारा महिने मागणी असते. अनेकांकडे काही महिन्यातून एकदा सत्यनारायणाची पूजा असल्याने नियमित या साहित्याची खरेदी होत असते. धार्मिक स्थळे जसे मंदिर, दरगाह, गुरुद्वारा आदी ठिकाणी धूप, अगरबत्ती अथवा विविध प्रकारच्या पूजा साहित्यांची मागणी असते. टाळेबंदीत मोठे सण निघून गेल्याने पूजा साहित्य विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही धार्मिक स्थळे बंद असल्याने या साहित्याची विक्री मर्यादित होत आहे. काही दिवसावर आलेल्या नवरात्र उत्सवात मोठय़ा संख्येने नागरिक मंदिरात नऊ दिवस आरती, पूजा करता तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या निमित्ताने बाजारात उलाढाल वाढते. परंतु यंदा दुर्गा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या असल्याने विक्रेते चिंतेत आहेत.
गेल्या सात महिन्यांपासून पूजा साहित्य व अगरबत्तीचा व्यवसाय ७० टक्के प्रभावित झाला आहे. धार्मिक स्थळेही बंद असल्याने बाजारातील आíथक उलाढाल कमालाची घटली आहे.
– सुनील खडसे, संचालक, सुगंध शॉपी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 12:07 am