१७ जिल्ह्य़ांतील रस्त्यांवर संपूर्ण खड्डेमुक्ती

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या प्रमुख राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १७ जिल्ह्य़ांतील रस्ते शंभर टक्के खड्डेमुक्त झाले असून प्रमुख राज्य मार्गावरील ९७ टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गावरील ८३ टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित कामे वेगाने सुरू असून येत्या १५ दिवसांत संपूर्ण राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. राज्यात ज्या रस्त्यावर खड्डे आढळले तर नागरिकांनी कळवावे, ते खड्डे तातडीने बुजविण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. मुदतीत सर्व खड्डे बुजवून झालेले नाहीत याची कबुलीच मंत्र्यांनी दिली.

येत्या १५ डिसेंबपर्यंत संपूर्ण राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा पाटील यांनी केली होती. त्याबाबत आज विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना हे अभियान यशस्वी झाल्याचा दावा पाटील यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील रस्त्यांची कामे ही वाहतुकीचा अंदाज न घेता, क्षमता न पाहता करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात राज्य मार्गावरील रस्त्यांवर खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकूण ८९ हजार १९० किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये सहा हजार १६३ किमीचे प्रमुख राज्य मार्ग, ३० हजार ९७० किमीचे राज्य मार्ग आणि ५२ हजार ५७ किमीचे लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. आजपर्यंत यातील प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे पडलेल्या २३  हजार ३८१ किमी लांबीच्या रस्त्यांपैकी २२ हजार ७३६ किमी (९७.२५ टक्के) लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर उर्वरित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. राज्यातील १७ जिल्ह्य़ांतील खड्डे शंभर टक्के बुजविण्यात आले आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती,औरंगाबाद आणि नागपूर विभागांतील सर्व जिल्ह्य़ांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी टिकाऊ  डांबरीकरण आणि रोड कोटिंग करण्यात आले. काही तुरळक ठिकाणी तांत्रिक अडचणी, अवकाळी पाऊस अशा कारणांस्तव खड्डे भरण्यास विलंब झाल्याची कुबलीही त्यांनी या वेळी दिली.

प्रमुख जिल्हा मार्गाचे रस्ते हे जिल्हा परिषदांकडून बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले आहेत. यातील ५२ हजार किमी लांबीच्या रस्त्यांपैकी ३२ हजार ५८८ किमी लांबीच्या रस्त्यांवर खड्डे पडले होते. यातील २६ हजार ९९४ किमी लांबीच्या (८२.८४ टक्के) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदांकडून वर्ग झालेले रस्ते हे रोहयोअंतर्गत तयार केलेले असल्यामुळे तसेच त्यांची अवस्था खूपच खराब असल्यामुळे या रस्त्यांची कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संपूर्ण खड्डेमुक्ती झालेली नाही हे ‘लोकसत्ता’ने आजच प्रकाशित केले होते. त्यावर मंत्र्यांनी शिक्कामोर्तबच केले.

या रस्त्यांची  कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी प्रथमच १० कि.मी. लांबीचे रस्ते  वार्षिक देखभाल दुरुस्तीसह तयार करण्यासाठी कंत्राट देण्यात येत आहेत. यानुसार या मार्गावरील खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली असून त्याची वार्षिक देखभाल दुरुस्ती ही कंत्राटदार करणार आहेत.