• नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
  • अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई, ५२ लाखांचा माल जप्त

उपराजधानीत दिवाळीच्या तोंडावर काही व्यावसायिकांकडून कमी वेळात जास्त नफा कमावण्याकरिता निकृष्ट खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. या खाद्यपदार्थामुळे मानवाचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. अन्न व औषध प्रशासन  विभागाने गेल्या चार दिवसांत शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन प्रतिष्ठानांवर छापे मारून तब्बल ५२ लाख रुपयांहून अधिक माल जप्त केला. हे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत.

नागपूरसह राज्यातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध अन्न मिळावे म्हणून विशेष काळजी घेण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. याकरिता शासनाने बरेच कायदेही केले आहेत. परंतु मोठय़ा प्रमाणात नफा कमावण्याकरिता काही व्यावसायिक सगळे नियम धाब्यावर बसवून सर्रास भेसळयुक्त वा निकृष्ट दर्जाच्या वस्तू सर्वसामान्य ग्राहकांना विविध प्रतिष्ठानांवर विकतात. काही व्यावसायिकांकडून बनावट लेबल लावूनही वस्तूंची विक्री केली जाते. उच्च प्रतीचे नाव बघून वस्तू जास्त किमतीला घेतल्या गेल्यावरही त्या सेवन केल्यास काहींचे आरोग्यही धोक्यात येते. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केल्यावरही अशा व्यावसायिकांमध्ये काहीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

दिवाळीच्या तोंडावर नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत काही व्यावसायिकांनी जास्त नफा कमावण्याकरिता कमी दर्जाच्या खाद्य तेलाला दुसरेच ब्रॅंडचे लेबल लावून विक्री करणे, भेसळयुक्त माव्याची वा निकृष्ट दर्जाची मिठाई विकणे, रवा-मैदा- बेसनसह वनस्पती तेलात भेसळ करून त्याची विक्री करण्याकरिता बऱ्याच क्लृप्त्या सुरू केल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपुरातील तीन प्रतिष्ठानांवर छापे मारण्यात आले.

या कारवाई अंतर्गत १५ ऑक्टोबरला इतवारीतील रामदेवबाबा प्रा. लिमिटेड या प्रतिष्ठानात कमी दर्जाचे १ लाख २६ हजार रुपयांचे राइस ब्रान ऑइल, तुलसी ब्रॅंड जप्त करण्यात आले. या तेलाचे उत्पादन ब्रम्हपुरी,

चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. त्यात काही आक्षेपार्ह जाहिरातीही आढळून आल्या. दुसरी कारवाई १६ ऑक्टोबरला इतवारी भाजीमंडीतील कन्हैया डेरी हाऊस येथे आनंदी  ब्रॅंडच्या बॅलन्स फुडवर करण्यात आली. येथे १ लाख ६३ हजार ७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तिसरी कारवाई बक्षी ले-आऊट, वाडी, नागपूर येथील गजानन ऑइल प्रा. लि., बी. के. मार्केटींगच्या गोदामावर करण्यात आली. तेथून तब्बल ४८ लाख ९५ हजार ४५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

या गोदामात रिफायनरी सोयाबीन ऑईल, रिफायनरी सनफ्लॉवर ऑईलसह इतर माल होता.

दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या कारवाईने नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले तरी या सगळ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाला अंकुश लावता येणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) (महाराष्ट्र) शशिकांत केकरे व सहाय्यक आयुक्त एम. एस. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात अन्न व सुरक्षा अधिकारी ए. एस. महाजन, एम. डी. तिवारी, के. आर. गेडाम यांनी केली. दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना सुरक्षित व शुद्ध अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाने तपासणीच्या कामांना गती दिली आहे. गेल्या चार दिवसांत शहरात ५२ लाखांचा माल जप्त केला असून उत्पादित होणाऱ्या खाद्यपदार्थावर विभागाने नजर रोखली आहे. नागरिकांना शुद्ध अन्न मिळावे म्हणून विभाग कटिबद्ध आहे.

एम. एस. देशपांडे, सहाय्यक आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग, नागपूर.