X

‘मेयो’च्या जीर्ण इमारतीतील रुग्णांचा जीव टांगणीला!

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी पुढे मोठे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन वेळा छताचे प्लास्टर कोसळले; बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) जीर्ण इमारतीच्या छताचे प्लास्टर पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान दोनवेळा कोसळल्यावरही  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

मध्य भारतातील सर्वात जुन्या शासकीय रुग्णालयांपैकी मेयो रुग्णालय आहे. येथे विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथूनही रुग्ण येतात. येथील अनेक इमारती या सुमारे ४० ते ५० वर्षे जुन्या आहेत. काही इमारती जीर्ण झाल्यामुळे छताचे प्लास्टर वेळोवेळी कोसळत असतात. त्यामुळे रुग्ण आणि सेवेवर असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या जीविताला धोका संभवतो.  उपराजधानीत पावसाळी अधिवेशन सुरू असताना बालरोग विभागाच्या एका वार्डाचे छताचे प्लास्टर पडल्यामुळे एक सुरक्षा रक्षक जखमी झाला होता, तर दुसऱ्या घटनेत नवीन सर्जिकल कॉम्प्लेक्सचेही पीओपीचे छत कोसळले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी पुढे मोठे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या मेयोतील वार्ड क्रमांक चार, पाच, सहा, चोवीससह इतरही बरेच औषधशास्त्र, बालरोग विभाग, क्षयरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूतीशात्र विभागाचे वार्ड जुन्या इमारतींमध्ये आहे.

त्यामुळे भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी मेयो प्रशासनाने या सर्व इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या  सार्वजनिक बांधकाम विभागाला जुन्या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या सूचना केल्या होत्या. पावसाळी अधिवेशनातील घटना बघता तताडीने हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु या सूचनेकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान जुन्या इमारतीच्या  छताचा काही भाग कोसळल्यावर बांधकाम विभागाला इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबतचे पत्र दिले होते. अद्याप काम सुरू झाले नाही. पुन्हा स्मरणपत्र दिले जाईल.

– डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो, नागपूर.