राजकीय दबावात नासुप्रच्या अधिकाऱ्यांची कारवाई

आलिशान ‘रो-हाऊस’च्या  विक्रीत अडथळा ठरणारी एका महिलेची झोपडी नागपूर सुधार प्रन्यासने राजकीय दबावापोटी हटवली असून आता या जागेवर एका भाजप नेत्याच्या कंपनीने अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही नासुप्रकडून कोणतीही कारवाई केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नासुप्रच्या विकास आराखडय़ानुसार मौजा इंदोरा येथील खसरा क्रमांक २८/४ ही जमीन सार्वजनिक वापराकरिता आरक्षित आहे. त्या ठिकाणी पंधरा वर्षांपासून सुजाता नागदेवे आपल्या मुलीसह एका झोपडीत राहात होत्या. त्या भूखंडाच्या पाठीमागे महापालिकेचे विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र ऊर्फ विक्की कुकरेजा यांची ‘कुकरेजा इंपेरियल’ ही स्वतंत्र रो-हाऊस स्कीम निर्माण करण्यात आली. त्या इमारतीच्या मंजूर आराखडय़ानुसार प्रवेशद्वार नाल्याच्या बाजूने असल्याने तेथील घरांची विक्री होत नव्हती. त्यामुळे  प्रवेशद्वार बदलण्यासाठी त्यांनी सार्वजनिक उपयोगाची जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याकरिता  रात्री-अपरात्री सुजाता नागदेवे यांच्या घरी गुडांना पाठवून जागा रिकामी करण्यास सांगितले जायचे, अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. यासंदर्भात २०१४ मध्ये जरीपटका पोलीस ठाण्यात विक्की कुकरेजा व इतरांविरुद्ध अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शेवटी धमकी देऊन काम न झाल्याने नासुप्रच्या अधिकाऱ्यांमार्फत ती झोपडी ‘रिक्रीएशन स्पेस’साठी आरक्षित असल्याचा दाखला देऊन ८ जून २०१४ ला त्यांची झोपडी  तोडण्यात आलीली. त्यानंतर ती जागा नासुप्रने सुरक्षित करणे गरजेचे असताना ती मोकळी सोडण्यात आली. आता तेथे विक्की कुकरेजा यांनी अतिक्रमण केले असून ‘कुकरेजा इंपेरियल’ या इमारतीचे प्रवेशद्वार तेथे बांधण्यात आले आहे. त्यासंदर्भात नासुप्र व जरीपटका पोलिसांकडे अनेक तक्रारी करूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

अतिक्रमण काढण्याची मागणी

सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर असणारी झोपडी हटवून कुकरेजा इंपेरियलच्या मालकाने त्या ठिकाणी अतिक्रमण केले. चार वर्षांपासून हे अतिक्रमण असून त्यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही नासुप्रचे अधिकारी  अतिक्रमण का काढत नाही, असा सवाल मानव मुक्ती बहुउद्देशीय विकास मंडळाद्वारे करण्यात आला आहे. त्यासंदर्भात नासुप्रच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असतानाही कोणतीच कारवाई केली जात नाही. यावरून महिलेच्या झोपडीवर झालेली कारवाई ही राजकीय दबावातून व संबंधित बिल्डरला लाभ पोहोचवणारी आहे. त्यामुळे नासुप्रच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून बिल्डरचे अतिक्रमणही काढण्यात यावे, अशी मागणी मंडळाद्वारे करण्यात आली आहे.

 

इमारतीचे नाही, तर मंदिराचे अतिक्रमण

इमारत परिसरात रस्त्यावर महिलेचे अतिक्रमण होते. त्यावर नासुप्रने कायद्यानुसार कारवाई केली असेल. आपल्या इमारतीचे अतिक्रमण नसून स्वत:च्या जागेतच प्रवेशद्वार आहे. बाजूला सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर मंदिर बांधण्यात आले असून ते अतिक्रमण आहे.

      – वीरेंद्र ऊर्फ विक्की कुकरेजा, ‘कुकरेजा इंपेरियल’चे विकासक.