कुठल्याही रेशन दुकानातून धान्य घेण्याची मुभा – नागपुरात पथदर्शी प्रकल्प

मोबाईल कंपन्यांप्रमाणेच आता शिधापत्रिकाधारकांनाही ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा नागपुरात उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे पात्र लाभार्थ्यांला शहरातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलण्याची मुभा आहे. आधार क्रमांकावर आधारित संगणकीय धान्य वाटप योजनेंतर्गत राज्यात फक्त नागपुरात राबवण्यात येत असलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे ही बाब सुकर झाली आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्यामाध्यमातून गरिबांसाठी सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी प्रत्येक वस्तीत एक दुकानाची सोय करण्यात आली आहे. त्या भागातील शिधापत्रिकाधारकांना त्या संबंधित दुकानातूच आतापर्यंत धान्याची उचल करावी लागत होती. आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण धान्य वितरण प्रणालीचे संगणकीकरण करण्यात आले. शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आले. राज्यात नवीन सरकार आल्यावर आधार क्रमांकावर आधारित स्वस्त धान्य प्रणाली ही नवी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यात नागपुरात पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून तो यशस्वी ठरला आहे. या प्रकल्पांतर्गतच ही पोर्टेबिलिटीची सोय शिधापत्रिकाधारकांना मिळाली आहे. शिधापत्रिकाधरकांना शहरातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या वाटय़ाची धान्य उचल करता येईल, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी सांगितले.

नागपूर शहरात ६६५ स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदय योजनेतील ३६ हजार ६७३, प्राधान्य गट योजनेतील २ लाख ५४ हजार ५४९ असे एकूण २ लाख ९४ हजार ९६८  शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापकी ९८ टक्के शिधापत्रिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित शिधापत्रिकांची आधार नोंदणी एक महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आधारसंलग्न लाभार्थ्यांची ओळख पटवून पीओएस मशीनद्वारे धान्य वितरित होत आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत ऑक्टोबर २०१७ पासून धान्य वितरणाची नवीन पध्दत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. या पद्धतीमुळे १००टक्के धान्याचे वितरण हे खात्री करूनच केले जाते. नव्या प्रणालीत आधार ई-केवायसीची सुविधा आहे. त्यामुळे आधार संलग्न नसलेल्या नागरिकांना रास्त भाव दुकानात जाऊन आधार नोंदणी करता येते. गेल्या तीन महिन्यात १९ हजार ७८९ नागरिकांनी आधार नोंदणी केली आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून गेल्या तीन महिन्यांमध्ये ३२ हजार ६०१ शिधापत्रिकाधारकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. लाभार्थी धान्य उचलण्यास असमर्थ आहेत. त्यांना स्वेच्छेने नॉमिनीची निवड करून धान्य उचल करता येणार आहे, असे काळे यांनी सांगितले.

पाच हजार मे.टन धान्याची बचत

नव्या प्रणालीमुळे बोगस शिधापत्रिकाधारकांकडून होणारी धान्य उचल थांबली आहे. तीन महिन्यात ५ हजार ४५ मेट्रिक टन धान्याची बचत झाली. हे धान्य अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी तीन महिन्यापासून धान्याची उचल केली नाही अशा लाभार्थ्यांना नोटीस देऊन या योजनेतून वगळून नवीन पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी सुधारित धान्य वितरण पद्धती थेट वाहतुकीद्वारे करण्यात येत आहे.