X

प्रेमबंधात अडकलेल्या तरुणाईत सकारात्मक बदल

विजातिय लिंगाविषयी आकर्षण निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. मात्र, याविषयी बालपणापासूनच मुलांना घरातून माहिती मिळायला हवी.

तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे सर्वेक्षण

प्रेमात पडले की मुले-मुली बिघडतात, बेजबाबदारपणे वागायला लागतात, असा अनेक पालकांचा आरोप असतो, परंतु या आरोपाला छेद देणारी माहिती तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. प्रेमबंधात अडकलेल्या तरुणाईत अनेक सकारात्मक बदल होत असून विनम्रता, जबाबदारी आणि इतरांना क्षमा करण्याची वृत्ती वाढत असल्याचे हा अभ्यास सांगतोय.

तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील बॅचरल ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी प्रेमात पडलेली तरुणाई मानसिकदृष्टय़ा कसा विचार करते, यावर सर्वेक्षण केले. अरुणा एक्का, वैशाली गजभिये, भारती तिवारी आणि जिग्नाबेन वानकर या बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. ‘स्टडी ऑफ सायकोसोशल स्टेट ऑफ दी अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स टू देअर लव रिलेशनशिप’असा या प्रकल्पाचा विषय होता. डॉ. सुनिर्मल कबिराज यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यात ५० टक्के मुली व तेवढय़ाच मुलांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. या सर्वेक्षणाच्या अभ्यासाअंती जो निष्कर्ष पुढे आला तो थक्क करणारा होता. कारण, या सर्वेक्षणात सहभागी तरुणाई प्रेमात पडल्यावर अधिक आशावादी, विनम्र अन् क्षमाशील झाल्याचे जाणवले. अर्थात, काही विद्यार्थ्यांनी प्रेमात पडल्यावर ईर्षां, द्वेष आणि मोबाईलमुळे  वेळेचा अपव्यय वाढल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. पदवीच्या तीन वर्षांमध्ये बहुतेक विद्यार्थी प्रेमबंधात असतात. यादरम्यान त्यांच्यात संवाद आणि जबाबदारीतही संशोधनकर्त्यांना वाढ दिसून आली. सौंदर्य, हसणे, व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता इत्यादींमुळे मुले एकामेकांकडे आकर्षित होत असून विचार जुळत असल्यास हे नाते दीर्घकाळ टिकते, असेही या अभ्यासात आढळून आले.

पालक मित्र झाल्यास समस्या सुटतील

विजातिय लिंगाविषयी आकर्षण निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. मात्र, याविषयी बालपणापासूनच मुलांना घरातून माहिती मिळायला हवी. त्यामुळे भावनांचे संतुलन मुलांना शक्य होते. त्याशिवाय वर्तनातील बदल पहिल्यांदा पालकच पाहत असतात. त्यात काही वेगळे जाणवल्यास पालकांनी मुलांना वेळ द्यावा. कुमार वयात मुलांबरोबर पालकांचे मित्रत्वाचे संबंध असावेत. जेणेकरून मुले मनातील गोष्टी पालकांशी बोलू शकतील. पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर लादू नयेत. प्रेमबंधात मुले तणाव, हायपरटेंशन, आक्रमकता इत्यादी समस्यांनी ग्रस्त होतात. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. कुमार वयात घडणाऱ्या अशा गोष्टींबाबत समाजानेही मोठेपणाने काही गोष्टी मान्य करायला हव्यात, अशा सूचना संशोधकांनी केल्या आहेत.

म्हणून हा विषय प्रबंधनासाठी निवडला

प्रेमबंध कुमार वयात घट्ट होत असतात. या काळात मानसिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक परिवर्तन होत असते.  हा मुळात फारच भावनिक जैविक घटक आहे. म्हणूनच हा विषय बीएसडब्ल्यूच्या प्रबंधनासाठी निवडण्यात आला.

– डॉ. सुनिर्मल कबिराज, प्राध्यापक, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय