मेडिकल, मेयोतील चित्र; डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण जास्त

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचा प्रकोप शांत होत असल्याचे सकारात्मक चित्र असतानाच गैरकरोनाच्या विविध आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत.  मेडिकल व मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत सध्या करोनाचे केवळ ५ रुग्ण दाखल असून गैरकरोनाच्या  रुग्णांची संख्या १,३७० च्या जवळपास आहे. त्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण जास्त आहेत.

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या नोंदीनुसार, सध्या मेडिकलमध्ये ९५०  रुग्ण दाखल आहेत. त्यातील ४ करोनाचे, २२ सारीचे, ६८ म्युकरमायकोसिसचे (काळी बुरशी), ८५६ गैरकरोनाच्या रुग्णांचा समावेश आहे. त्यातच २४ तासांमध्ये मेडिकलमध्ये करोनाचा एकही मृत्यू नसला तरी विविध आजाराचे ११ मृत्यू नोंदवले गेले आहेत.  मेयो रुग्णालयात सध्या सुमारे ४२५ रुग्ण दाखल आहेत. यामध्ये १ करोनाचा तर इतर विविध आजाराचे रुग्ण  आहेत. दोन्ही रुग्णालयांमध्ये सुमारे १० दिवसांपूर्वी गैरकरोनाच्या दाखल रुग्णांची संख्या आताच्या संख्येहून ४० टक्क्यांहून कमी होती. परंतु आता गैरकरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातही तूर्तास दोन्ही रुग्णालयांच्या बाह्य़रुग्ण विभागात डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे.  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतही (एम्स) डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे निरीक्षण औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. पी. जोशी यांनी नोंदवले आहे.

करोना वार्डाचे गैरकरोनात रूपांतर

मेडिकलमध्ये गैरकरोनाचे रुग्ण वाढल्याने करोनासाठी वापरल्या जाणाऱ्या वार्डातील २ वार्ड औषधशास्त्र विभाग, २ वार्ड शल्यक्रियाशास्त्र विभाग, १ वार्ड प्लास्टिक सर्जरी विभागासाठी दिला आहे. मेयोतही कोविड वार्ड म्हणून विकसित केलेला सर्जिकल कॉम्प्लेक्स गैरकोविड रुग्णांसाठी उपलब्ध असून इतरही वार्ड उपलब्ध केले जात आहे.