शवविच्छेदन अहवाल

नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील टी-४ वाघिणीच्या गळ्याला नायलॉनचा फास बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनादरम्यान स्पष्ट झाले आहे. नायलॉन फासामुळे तिच्या मानेला गंभीर व खोल जखम झाली होती आणि जखमेच्या ठिकाणी अळ्या झाल्याचे यात दिसून आले.

पांढरकवडा वनखात्याअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यात टी-४ वाघिणीच्या गळ्यात फास असल्याची ११ सप्टेंबर २०१७ ला वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. तिच्यावर उपचार करता यावे म्हणून जेरबंद करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र, तिची हालचाल ही रात्रीच्या वेळेस होत असल्याने तिला बेशुद्ध करता येत नव्हते. पाच मे २०१८ पर्यंत या एकाच परिसरात ती होती. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी १६ मार्च २०१९ला कक्ष क्र. १३३ मध्ये पाणवठय़ाजवळील कॅमेरा ट्रॅपमध्ये तिचे छायाचित्र आले. पुन्हा तिला जेरबंद करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. १७ मार्चला ती सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष दिसून आली. त्यावेळी तिची हालचाल फारच मंदावलेली होती. त्यानंतर क्षेत्रीय वनाधिकारी व पशुचिकित्सकांनी तिला बेशुद्ध केले. उपचारासाठी तिला बचाव वाहनातील पिंजऱ्यात टाकल्यानंतर रात्री आठच्या सुमारास ती मृत पावल्याचे लक्षात आले. शवविच्छेदनादरम्यान तिच्या अवयवांचे नमुने घेण्यात आले. मात्र, याचवेळी तिच्या मानेला नायलॉन दोरीचा फास असल्याचे दिसून आले. शवविच्छेदनानंतर वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक आर.एम. रामानुजम, पांढरकवडा पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. टी.पी. बावणे, जांबचे पशुधन विकास अधिकारी डॉ. उदरराज नाकाडे, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुचिकित्सक डॉ. चेतन पातोंड, वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे आदित्य जोशी, डॉ. अंकुश दुबे, डॉ. सैय्यद बिलाल आदी होते, असे पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांनी कळवले आहे.