• सेवेत असलेल्या ७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
  • विविध कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना फटका बसणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विदर्भातील सगळी रिक्त पदे भरण्यासह येथे रूजू न होणाऱ्यांवर कारवाईची घोषणा केली होती, परंतु विदर्भातील परिवहन कार्यालयांतील सगळ्या संवर्गातील तीस ते पन्नास टक्के पदे रिक्त असताना अद्याप ती भरल्या गेली नाहीत. त्यातच रिक्त पदांनी ग्रासलेल्या या कार्यालयांतून सात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांच्या अचानक इतरत्र बदल्या करण्यात आल्या असून त्या बदल्यास इतर निरीक्षक देण्यात आले नाहीत. त्यामुळे ही कार्यालये खिळखिळी होऊन सर्वसामान्यांना फटका बसण्याचा धोका आहे.

राज्यात सत्तापरिवर्तनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थानापन्न होऊन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेक महत्त्वाची मंत्रीपदे विदर्भाच्या वाटय़ाला आली. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या सर्वागीण विकासासाठी येथील सगळी रिक्त पदे भरण्यासह बदलीनंतर येथे रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची घोषणा केली होती. त्यानुसार परिवहन विभागातील काही अधिकारी रूजू न झाल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही झाली. मात्र काही महिन्यातच हा निर्णय फिरवत या कर्मचाऱ्यांना पुन्हा मर्जीच्या ठिकाणी रूजू करण्यात आले. नागपूरसह विदर्भातील सगळ्याच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत सध्या सगळ्या संवर्गातील ३० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत.

chart

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही पदे तातडीने भरणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. त्यातच राज्याच्या परिवहन विभागाकडून अवेळी राज्यातील ११ सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या असून त्यात विदर्भातील सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक बदल्या या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या नागपूर ग्रामीणमधील ४ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील १ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात इतर कर्मचारी शासनाने देणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आधीच रिक्त पदांनी ग्रासलेल्या या कार्यालयांची कामे विस्कळीत होण्याचा धोका आहे. या विषयावर परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

बदल्यांच्या नियमांना खो’?

शासनाच्या नियमाप्रमाणे नवीन सेवेवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्याची तीन वर्षे बदली करता येत नाही. विशेष बाब म्हणून पती-पत्नी एकत्रीकरण, कुटुंबातील कुणाला गंभीर आजारासह इतर काही निवडक कारणास्तव या बदल्या शासनाला करता येतात, परंतु अचानक विदर्भातील सात कर्मचाऱ्यांसह राज्यातील ११ जणांच्या विनंतीवरून या बदल्या झाल्याने बदल्यांच्या नियमांना खो दिल्या गेल्याची चर्चा परिवहन विभागात आहे. त्यातच या कर्मचाऱ्यांच्या बदल्यास विदर्भातील या कार्यालयांना इतर कर्मचारी न मिळाल्याने येथील नागरिकांना चांगल्या सेवा मिळण्याचा अधिकार नाही काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची कामे

  • शिकाऊ व कायम वाहन चालवण्याचा परवाना देणे
  • वाहनांचे फिटनेस तपासणी करणे
  • वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे
  • फिरत्या गस्त पथकांवर वाहन तपासणी करणे
  • परिवहन विभागाकडून विविध कारवाई अभियान राबवणे यासह इतर