झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टिप्परने चिरडले

नागपूर : विकास कामांच्या नावाखाली रस्त्यांवर खोदण्यात आलेले खड्डे मृत्यूचे सापळे ठरले आहेत. ठराविक अंतराने खड्डय़ांमुळे अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असून प्रशासनाच्या अशाच गलथान कारभारामुळे सोमवारी पुन्हा एक बळी ठरला आहे. खड्डय़ात दुचाकी अडकल्याने रस्त्यावर पडलेल्या झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयला मागून येणाऱ्या टिप्परने चिरडले. ही घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील टेलिफोन एक्सचेंज चौकात घडली. प्रशांत धर्माजी सोनटक्के (४७) रा. कृष्णनगर, गिट्टीखदान असे मृताचे नाव आहे.

प्रशांत हा सोमवारी सकाळी कामावर रुजू झाला.  खाद्यपदार्थाचे पार्सल घेऊ न एमएच-३१, ईव्ही-८९६९ या क्रमांकाच्या मोपेडने आजमशाह चौकाकडून टेलिफोन एक्सचेंज चौकाकडे जात होता. त्यांनी हेल्मेट घातले होते. टेलिफोन एक्सचेंज चौकात एमएच-३१, ईएन-०७४४ या क्रमांकाचा टिप्पर मोटारसायकलला घासून गेला. त्यामुळे प्रशांतचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती खड्डय़ात गेली. तो उजवीकडे पडल्याने त्याच्या मानेवरून टिप्पर गेले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर नागरिकांनी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. टिप्पर चालकाला ताब्यात घेतले. पंचनामा करून प्रशांत यांचा मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. गुन्हा दाखल करून टिप्पर चालकाला अटक करण्यात आली.

कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

गेल्या एक महिन्यांपासून या भागात केबल टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. कंत्राटदाराने काम पूर्ण केले नाही. खड्डाही बुजवला नाही. त्यामुळे या भागात नेहमी अपघात घडतात. यामुळे एका डिलेव्हरी बॉयचा जीव गेला. आता तरी कंत्राटदार व संबंधित कंपनीला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, प्रशांत यांच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराविरुद्धही प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत अनेकांनी गमावला जीव

खड्डय़ांमुळे आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या कामामुळे सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम ते कडबी चौक मार्गावर पंजाब रेस्टॉरेंटजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण ट्रकखाली चिरडला गेला. त्याच्या काही महिन्यांपूर्वी शंकरनगर ते अंबाझरी मार्गावर नासुप्र जलतरण तलाव परिसरात खड्डय़ातून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, एलएडी महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनी क्रेनखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. असे अनेक अपघात खड्डय़ांमुळे घडले आहेत.

वेळ पाळण्याची घाई

गेल्या काही वर्षांमध्ये डॉमिनोज पिझ्झा, पिझ्झा हट स्वीगी, झोमॅटो, उबर ईट्स अशा संकेतस्थळावरून घरपोच अन्नपदार्थ पुरवले जातात. या कामांसाठी कंपन्यांनी दुचाकीस्वार तरुण नेमले आहेत. अन्नपदार्थ घरापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांना वेळमर्यादा घालून दिलेली असल्याने अनेकदा त्यांना वाहतूक नियम वेशीवर टांगून वाहन चालवावे लागते. शिवाय ग्राहकाच्या घराचा पत्ता माहीत नसल्याने चालत्या वाहनावर मोबाईल हाताळावे लागते. ही वेळमर्यादा पाळण्याच्या ओघात अनेकदा त्यांचे अपघात होतात. पण, डिलेव्हरी बॉयच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीच कंपनी काही बोलत नाही, हे विशेष.