रुग्णांचा जीव टांगणीला; अत्यवस्थ रुग्णांना मन:स्ताप

शहरातील खड्डय़ांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा मन:स्ताप वाढला असतानाच नागपूरच्या मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डागा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या शासकीय रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील ही स्थिती असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

जोखीमेतील प्रसूती, अपघात किंवा इतर सर्व गंभीर संवर्गातील रुग्णांचा वेळीच उपचार सुरू करण्याकरिता प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. हा रुग्ण वेळीच रुग्णालयात पोहोचणे, विविध वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी रुग्णालय परिसरातील रस्ते चांगले असायला हवे, परंतु सध्या नागपूरच्या मेडिकल, सुपरस्पेशालिटी, मेयो, डागा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या रुग्णालयाच्या आतील व परिसरातील रस्ते खड्डय़ांनी माखले आहेत. गंभीर संवर्गातील रुग्णांनाही येथील कॅज्युल्टीत पोहचायला अनेकदा विलंब होतो. हा प्रकार अत्यवस्थ रुग्णांच्या जीवावर बेतणारा ठरतो. मेडिकलच्या रस्त्यांची काही महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीसह नवीनीकरण झाले, परंतु या पावसाळ्यात फारसा पाऊस न पडताही मुख्य प्रवेशद्वारावर खड्डे पडले आहेत. येथील बाह्य़रुग्ण विभागाकडे जाणारा रस्ता, दंतकडून ट्रामा केयरकडे वळणारा रस्ता, सुपरमधून मेडिकलला येणारा रस्त्यावर खड्डे पडले आहे. मेयो, डागा, सुपर आणि डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून आतमध्येही खड्डय़ांचे साम्राज्य आहे.

खड्डय़ांमुळे रोज या सर्व रुग्णालयांमध्ये उपचाराला येणाऱ्या सुमारे ६ हजार बाह्य़रुग्ण विभागातील तर किमान १५० ते २०० दाखल होणाऱ्या रुग्णांना मन:स्ताप होतो. रुग्णालयातील वार्ड वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहे. त्यामुळे रुग्णांना अंतर्गत रस्त्याने स्ट्रेचरवर एमआरआय, सीटी स्कॅनसह विविध वार्डात हलवताना खड्डय़ांमुळे झटके बसतात. त्यामुळे काही अत्यवस्थ रुग्णांना समस्यांना तोंड द्यावे लागते. रुग्णांना होणाऱ्या त्रासामुळे काहींचा जीवही जात असला तरी त्याच्या मृत्यूचे कारण शेवटी डॉक्टरांकडून उपचार होणारा आजार प्रामुख्याने दाखवला जात असल्याचे नातेवाईक सांगतात.

आंतरराष्ट्रीय वैद्यकीय हब कसे साकारणार?

राज्यात केवळ नागपूरला मेडिकल आणि मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत, तर सुपरस्पेशालिटी, डागा, डॉ. आंबेडकर या रुग्णालयांतही रोज हजारोंच्या संख्येत गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांवर उपचार होतात. मोफत किंवा माफक दरात रुग्णांवर उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, अद्ययावत तपासणीच्या सुविधा असल्यामुळे येथे मध्य भारतातून येणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यातच शहरात जागतिक दर्जाची खासगी रुग्णालयेही येत आहेत. त्यामुळे नागपूरला भविष्यातील वैद्यकीय हब म्हणून बघितले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी तसे नागपूरकरांना स्वप्नही दाखवले आहे, परंतु शासकीय रुग्णालयातील खड्डे बघता हे स्वप्न कसे साकारणार? हा प्रश्न नागपूरकर उपस्थित करत आहेत.

रामझुल्याच्या उतारावरही खड्डे

नागपूरच्या मेयो, डागा किंवा मेडिकलमध्ये येणारे बरेच रुग्ण भंडारा रोडवरील रामझुल्यावरून (उड्डाण पूल) येतात. पुलावर मेयोकडील भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांत रुग्णवाहिका वा इतर वाहनांनी जाणाऱ्यांनाही चांगलेच झटके बसतात.

मेडिकल परिसरातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यांना काही ठिकाणी पडलेले खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहे. खड्डय़ांमुळे रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाचे प्रयत्न आहे, परंतु खड्डय़ांमुळे रुग्णांना विलंब होत असल्याची प्रशासनाला तक्रार नाही.’’

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर