• श्रमदान करून खड्डे बुजविले
  • तर अधिकाऱ्यांचे कपडे फाडू

शहरात सिमेंट रोडचे बांधकाम करतांना दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. अपघातात अनेकांचे मृत्यूही झाले. प्रहारने नागपूर महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी निवेदन दिले, परंतु काहीच झाले नाही. त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जयश्री टॉकीज परिसरात अर्धनग्न होऊन श्रमदानातून खड्डे बुजवले. येत्या दहा दिवसांत शहरातील खड्डे बुजवण्यात आले नाही तर महापालिकेतील अधिकाऱ्यांचे कपडे फाडण्याचा इशारा प्रहारकडून देण्यात आला.

आंदोलनापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातात दगावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रशांत तन्न्ोरवार म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून नागपूरला स्मार्ट सिटी करण्याकरिता सर्वत्र सिमेंट रस्ते तयार होत आहे, परंतु कंत्राटदाराने नागरिकांना दुसरा मार्ग उपलब्ध करून देण्याच्या नियमांना हरताळ फासला. त्याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत शहरात सुमारे ३७ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला. प्रहारने नागपूर महापालिकेला ३ ऑगस्ट २०१७ ला निवेदन देऊन ९ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्याचे निवेदन दिले. त्यावरही महापालिकेने काहीच केले नाही. अधिकाऱ्यांना इशारा म्हणून आज रस्त्यावर अर्धनग्न होऊन श्रमदानातून खड्डे बुजवून नागरिकांना वाहतुकीसाठी मदत करण्यात आली, परंतु येत्या दहा दिवसांत महापालिकेने खड्डे बुजविले नाही तर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचेच कपडे फाडण्यात येईल. याप्रसंगी अभिजित ठाकरे, आसिफ शेख, राम पराडकर, छत्रपाल करडभाजने, हितेश चोले, समीर काळे, रितेश तन्न्ोरवार, ललित पौनिकर, सागर सूर्यवंशी, गौरव कुराडकर, अभिषेक तन्न्ोरवार, यशवंत पाटील, उदय आस्वले, आसिफ अंसारी, मोहसिन खान, मनोज मिश्रासह इतर उपस्थित होते.

महापालिकेने रातोरात खड्डा बुजवला

प्रहार संघटनेकडून पोलिसांकडे कॉटन मार्केट चौकातील सुमारे दीड फुटाच्या खड्डय़ावर आंदोलनाकरिता मंगळवारी परवानगी मागण्यात आली होती. ही माहिती नागपूर महापालिका आणि संबंधित कंत्राटदाराला कळताच त्यांनी रातोरात खड्डा बुजवला. त्यामुळे सकाळी हा प्रकार बघून प्रहारच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करायचे कुठे, हा प्रश्न पडला होता, परंतु दुपारनंतर दुसरे स्थळ निश्चित करून आंदोलन करण्यात आले.