14 November 2019

News Flash

वादळामुळे वीज कंपन्यांना १४ कोटींचा फटका

विदर्भात ७,८०० वीज खांब कोलमडले असून १ हजार किलोमीटरच्या वीज तार तुटल्या.

प्रतिनिधिक छायाचित्र

विदर्भात ७,८०० वीज खांब कोसळले, एक हजार किमीच्या तारा तुटल्या

महेश बोकडे, नागपूर

मे आणि जून महिन्यात विदर्भासह राज्याच्या इतरही भागात झालेल्या वादळामुळे ठिकठिकाणी वीज खांब आणि तारा तुटल्या. यामुळे वीज कंपन्यांचे एकूण १४ कोटींचे नुकसान झाले. विदर्भात ७,८०० वीज खांब कोलमडले असून १ हजार किलोमीटरच्या वीज तार तुटल्या.

नागपूरच्या गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल या भागाचा अपवाद सोडला तर विदर्भात महावितरणकडून वीजपुरवठा होतो. विदर्भात १ एप्रिल २०१९ ते ८ जून २०१९ या दरम्यान वीज खांब पडणे, वीज तार तुटणे, वीज उपकेंद्र निकामी होणे यासह इतर वीज यंत्रणेतील दोष यापोटी वीज कंपन्यांना १८ कोटींचा फटका बसला आहे. त्यातील ९५ टक्के नुकसान मे आणि जूनमधील वादळामुळे झाले. एकूण उच्च दाबाचे २ हजार ५० तर लघु दाबाचे ५ हजार ७०० वीज खांब पडले तसेच  उच्च दाबाच्या ३५० किमी आणि लघु दाबाच्या ७०० किमीच्या वीज तार तुटल्या. ५० रोहित्र कायमचे तर १५० हून जास्त रोहित्र अंशत: बंद पडले. १२५ हून अधिक वितरण पेटय़ा, शंभराहून अधिक मीटरही नादुरुस्त झाले.

विदर्भात सर्वाधिक सव्वाचार कोटींचा फटका यवतमाळ जिल्ह्य़ाला तर त्यानंतर नागपूरमध्ये शहर आणि ग्रामीण मिळून  २.२५  कोटींचा फटका बसला. अमरावती जिल्ह्य़ात १.८० कोटींची हानी झाली आहे.

वीज यंत्रणेची हानी

जिल्हा           हानी (कोटीत)

अकोला           १.५७

बुलढाणा          ०.१९

वाशीम             १.४९

अमरावती         १.८०

यवतमाळ         ४.१८

चंद्रपूर             ०.८७

गडचिरोली        ०.३२

भंडारा               ०.२२

गोंदिया              ०.२६

नागपूर (श.)     १.२०

नागपूर (ग्रा.)     १.१४

वर्धा                   ०.७८

तिघांचा मृत्यू

दरम्यान, या वीज प्रवाहित तारांचा स्पर्श झाल्याने तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन नागपूर आणि एक अमरावती जिल्ह्य़ातील आहे.

‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे विदर्भातील विविध जिल्ह्य़ांतील वीज यंत्रणेला थोडय़ा प्रमाणात फटका बसला आहे. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलून दुरुस्तीची कामे पूर्ण केली व वीजपुरवठा सुरळीत केला.’’

– दिलीप घुगल, प्रभारी प्रादेशिक संचालक, महावितरण, नागपूर.

First Published on June 18, 2019 12:17 am

Web Title: power companies suffer loss of 14 crores rupees due to the storm