News Flash

वीज महागणार

मुंबईतील काही भाग वगळता महावितरणच्या अडीच कोटी वीजग्राहकांच्या खिशावर वीजेचा आणखी भार पडणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

घरगुती व कृषीपंपासाठी एप्रिलपासून नवे दर

दरमहा सर्वच क्षेत्रांमध्ये महागाईशी सामना करावा लागणाऱ्या राज्यातील नागरिकांना आगामी महिन्यापासून वीजेसाठी अधिक दर आकारावा लागणार आहे. येत्या एक एप्रिलपासून घरगुती, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पावरलूम, पथदिव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजदरात वाढ होणार आहे. सर्वाधिक दरवाढ कृषी क्षेत्रात असून वाणिज्य व औद्योगिक क्षेत्राचे दर कमी होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईतील काही भाग वगळता महावितरणच्या अडीच कोटी वीजग्राहकांच्या खिशावर वीजेचा आणखी भार पडणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला २०१६ ते २०२० या चार वर्षांमध्ये चार टप्प्यांमध्ये वीज दरवाढ करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार  पहिल्या  टप्प्यात जून- २०१६ मध्ये, त्यानंतर १ एप्रिल २०१७ मध्ये वीज दरवाढ करण्यात आली होती.  तिसऱ्या टप्प्यात  १ एप्रिल २०१८ पासून दरवाढ होणार आहे. नवीन दरानुसार मीटर नसलेल्या पाच एचपी पंपापर्यंतच्या कृषी ग्राहकांना प्रती युनिट २२ पैसे, पाच ते सात एचपीचे पंप असणाऱ्या ग्राहकांना २१ पैसे तर ७.५ एचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी १६ पैसे प्रती युनिट जास्त पैसे मोजावे लागेल. घरगुती ग्राहकांसाठी ही दरवाढ प्रती युनिट  दोन ते पाच पैसे असेल. वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वहन शुल्क कमी होणार असल्याने  या ग्राहकांचे देयक कमी येईल, तर सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे, तात्पुरता पुरवठा, पावरलूमसाठी  विजेचे दर प्रतियुनिट १३ पैशापर्यंत वाढेल.

मुंबईचा काही भाग सोडून राज्यात महावितरणकडून दोन कोटी ४८ लाखाहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. त्यातील दोन कोटीहून जास्त ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे.

उद्योगाचे दर कमी होणार असल्याने राज्यात औद्योगिक क्षेत्राला याचा फायदा होईल. घरगुती वीज दरातही किरकोळ वाढ असल्याने त्याचा ग्राहकांवर फारसा परिणाम होणार नाही.

पी.एस. पाटील,  मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 3:59 am

Web Title: power firms in maharashtra to hike rates for electricity
Next Stories
1 विदर्भात यंदा तीव्र जलसंकट
2 ‘दूरध्वनी करा, घरातच वीज देयक भरा’
3 नितीन राऊत यांच्या नियुक्तीने प्रदेशाध्यक्ष चव्हाण गटाला धक्का
Just Now!
X