नागपूर रेल्वे स्थानकावरील प्रयोग

पणत्या आणि विद्युत दिव्यांच्या माळांनी देशात सर्वत्र दीपोत्सव सुरू असताना वीज निर्मितीमधील प्रकाशवाट अधिक सुकर व्हावी म्हणून नागपुरातील एका अभियंत्याने एका पावल्याने वीज निर्मिर्तीचा अभिनव प्रयोग नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारवर केला आहे. प्रवाशांच्या चालण्यामुळे येथील एलईडी दिवे उजळून निघाले असून अपारंपरिक ऊर्जा निर्मितीतील आणखी एक पाऊल पडले आहे.

देशातील शेकडो खेडय़ांमध्ये अजूनही काही तासांसाठी वीज असते. काही खेडय़ांतील तर अजूही काळोख दूर व्हायचा आहे. आवश्यकता आणि त्या तुलनेते वीज निर्मिती. त्यातही स्वस्त वीज हे मोठे आव्हान आहे. देशात खेडय़ापाडय़ात भ्रमणध्वनी पोहचले, परंतु २४ तास वीज उपलब्ध नाही. या अंधारवाटेतून प्रकाशमार्ग काढण्याचा प्रयोग नागपुरातील एका अभियंत्याने केला आहे. दाब (प्रेशर) यातून वीज निर्मिती करण्याची कल्पना फळाला आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पायदानच्या आकाराचे ‘कार्डबोर्ड’ बसवण्यात आले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनी त्यावर पाय ठेवताच विजेचे दिवे उजळून निघू लागले आहेत.

मंदार तुळकर यांनी हे ‘यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत’ करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. रेल्वे स्थानकावर दिवभरात हजारो प्रवासी ये-जा करत असतात. मुख्य प्रवेशद्वारातून केवळ त्यांच्या जाण्याने विजेचे दिवे लागत आहेत. या प्रयोगासाठी मुख्य प्रवेशद्वारावर पायदानासारखे कार्डबोर्ड बसवण्यात आले आहे. त्यावर पाय ठेवल्यानंतर वीज निर्मिती होते. या कार्डबोर्डने तयार केलेल्या विजेमुळे येथे लावण्यात आलेले २५ व्हॅटचे चार एलईडी दिवे प्रकाशमान होत आहेत. तुळंकर यांनी आता हे तंत्रज्ञान अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यामुळे भविष्यात लखलखाट निर्माण होऊ शकणार आहे. रेल्वे स्थानकावर येणाऱ्याने पायदानवर पाय ठेवता येथे बसलेले एलईडी दिवे लख्ख प्रकाश देतात. एका पावलामुळे १० व्हॅट वीज निर्मिती होते. रेल्वे स्थानकावर १५ दिवस प्रात्यक्षिक (डेमो) करण्यात येणार आहे.

रेल्वे अधिकारी प्रात्यक्षिक अहवालाचा अभ्यास करतील. त्यानंतर या तंत्रज्ञानात रेल्वेत कसा उपयोग करायचा यावर निर्णय घेतील. तुळंकर यांनी गेल्यावर्षी रेल्वे अधिकाऱ्यांना या संकल्पेचा प्रस्ताव दिला होता, परंतु त्यांना शंका उपस्थित केली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्याकडील प्रमाणपत्र आणि उत्पादनाचे चाचणी पुरावे दिले. तेव्हा ते नागपूर रेल्वे स्थानकावर हे प्रात्यक्षिक करू देण्यास तयार झाले. रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांपैकी येथे लावलेल्या ‘कार्डबोर्ड’ ३० ते ४० टक्के लोक पायदानावरून चालतात. यंत्रणेतील एलईडी दिवे लागण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पायदानावरून चालावे, यासाठी प्रयत्न केली जातील, असेही तुळंकर म्हणाले.

मोबाईल चार्जरनंतर..

तुळंकर यांनी विद्यार्थीदशेतच जोडय़ाने ‘मोबाईल चार्ज’ करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. त्याचे पेटेंटदेखील मिळवले आहे. त्यांनी कंपनीदेखील स्थापन केली आहे. जोडय़ांच्या ‘सोल’खाली सर्किट असलेली कीट बसण्यात येते. त्याप्रकारचे जोडे तयार करण्यात येत आहेत. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शॉपिंग, सार्वजनिक ठिकाण, तसेच फूटपाथ या ठिकाणी येणाऱ्या- जाणाऱ्यांमुळे वीज निर्मिती करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी त्यांना तंत्रज्ञान विकसित केले आहे.