ठाणेकर ज्येष्ठ नागरिकाचा अमेरिकेतही सन्मान
लहानपणी प्रत्येकाला कोणता तरी छंद असतो. कुणी गाडय़ा जमवितो, तर कुणी पोस्टाची तिकिटे. लहानपणी अशा प्रकारे जडलेला एखादा छंद पुढील काळात खूप आनंद मिळवून देत असतो. ठाण्यातील प्रदीप गुप्ते यांना वयाच्या आठव्या वर्षी पुठ्ठा, कागद, टूथपेस्ट या टाकाऊ वस्तूंपासून नवीन आलेल्या गाडय़ांच्या प्रतिकृती बनविण्याचा छंद जडला. लहानपणचा हा छंद आता वयाच्या ६८ व्या वर्षीही त्यांनी मनापासून जोपासला आहे. त्यांच्या या छंदाने त्यांना भरपूर आनंद मिळालाच, शिवाय विविध ठिकाणी मानसन्मानही मिळवून दिले आहेत. अमेरिकेमधील शिकागो शहरातील महाराष्ट्र मंडळानेहीत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
आत्तापर्यंत त्यांनी ५०-६० गाडय़ांच्या प्रतिकृती तयार केल्या असून फूड मिक्सर, बग्गी, क्रूझ आदी वस्तूही त्यांनी बनविल्या आहेत. कल्याण येथील सुभेदार वाडा येथे शिक्षण घेत असतानाच त्यांची हस्तकला आणि चित्रकलेशी नाळ जुळली. रस्त्यावरील येता-जाता गाडय़ा बघण्याच्या सवयीमुळे त्यांना गाडय़ांच्या प्रतिकृती बनविण्याची कल्पना सुचली. मेकॅनिकल इंजिनीयर असणारे प्रदीप गुप्ते हे बाजारात नवीन आलेल्या गाडय़ांचे निरीक्षण करतात आणि त्यानुसार त्या गाडय़ांची प्रतिकृती तयार करतात. मिल्क टँक, कंटेनर, दोन डम्पर, मर्सिडिज, मॅट कंपनी, बीएमडब्ल्यू आदी गाडय़ांच्या प्रतिकृतीही त्यांनी तयार केल्या आहेत. शिवाय मोटारसायकल, रिक्षा आदी गाडय़ाही त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या आहेत. सध्या या सर्व गाडय़ा त्यांनी घरी जपून ठेवल्या आहेत. तसेच काही गाडय़ा त्यांनी अनेकांना भेट म्हणून दिल्याचे ते सांगतात.