अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

नागपूर : देशातील प्रत्येक कुटुंबातील जात आणि विचार या दोन गोष्टी जाणण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)चा घाट रचला आहे, अशी टीका वंचित विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आंबेडकर म्हणाले, आपल्याकडे प्रत्येक दहा वर्षांत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली जाते. याद्वारे कुटुंबातील सदस्य संख्या व त्यांचे वय, घराचे क्षेत्रफळ, धर्म आणि ते अनुसूचित जाती/ जमातीचे असल्यास त्याची स्वतंत्र नोंद केली जाते. यावेळी जात हा नवीन विषय एनआरसीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे एनआरसीच्या माध्यमातून सरकार जात आणि संबंधित कुटुंबाचे विचार याची नोंद घेत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याच्या मागणीला मात्र हे सरकार बगल देत आहे. एनआरसीच्या विरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून त्याला ३५ सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाने पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सर्व पंतप्रधानांचा कार्यकाळ बघितला. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्वीकारली तेव्हा अर्थव्यवस्था सक्षम होती. परंतु मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटीसह इतर निर्णय घेत अर्थव्यवस्था खिळखिळी केली. हे सर्व करण्यामागे लोकांचे लक्ष इतर बाबींकडे वळवून आपले धोरण लागू करणे हा मोदींचा उद्देश असल्याचे दिसून येते अशी टीका केली.