प्रकाश आंबेडकर यांची टीका

नागपूर : राज्यातील चार जिल्ह्य़ांत भीषण पूरस्थिती आहे. लोकांचे जीव टांगणीला लागले आहेत. मात्र, राज्याचे मंत्री पूरस्थितीच्या पाहण्याच्या बहाण्याने पूर पर्यटन करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

वेधशाळेच्या अंदाजानंतरही मुख्यमंत्री मुंबईत न थांबता मोझरीला जनादेश यात्रेत व्यस्त होते. त्यांना लोकांच्या जीवापेक्षा जनादेश यात्रा महत्त्वाची वाटते. हे असंवेदनशील सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  खावटी योजनेत ४८ तासांत प्रत्येकला अडीच हजारांची तातडीची मदत द्यावी लागते. ही रक्कम सुद्धा सरकारने दिली नाही. अडीच लाखांवर लोक पुरात अडकले आहेत. त्यांच्या भोजनाची सोय सरकारने केली नाही. काही स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. सरकारने अजूनही पूरग्रस्तांच्या  पुनर्वसनाच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या नाहीत, याकडे आंबेकडकरांनी लक्ष वेधले.

पाकव्यात काश्मीरवरचा दावा संपेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत ३७० अनुच्छेद घालण्यास विरोध केला होता. भारताशी मनाने जुळलेल्या जम्मू-काश्मीरच्या जनतेला ते वेगळे करण्यास तयार नव्हते. सरकारने तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यांनी मुसदा समितीचे एक सदस्य अय्यंगर यांच्या माध्यमातून ३७० राज्यघटनेत आणले. आता काश्मीरची जनता मनाने भारतापासून तुटलेली आहे. अशा अवस्थेत हे अनुच्छेद रद्द करून आगीत तेल ओतण्याचे काम झाले आहे. हा केवळ राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी घाईत घेतलेला निर्णय आहे. यात कुठेही पाकव्याप्त काश्मीरचे काय होणार, याचा उल्लेख नाही. यामुळे अप्रत्यक्षपणे पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचा दावा जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने खुलासा करावा. लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी अक्साई चीनचा उल्लेख करून चीनला खिजविले आहे, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.