असुद्दीन ओवेसी जोपर्यंत जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत एमआयएमशी आमची युती कायम असल्याचा दावा वंचित बहुजनआघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. रविवारी ते माध्यमांशी बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीतर्फे रविवारी संविधान चौकात ‘सत्तासंपादन रॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी होण्यासाठी आंबेडकर रविवारी नागपुरात आले होते.  एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितशी काडीमोड घेतल्याची घोषणा दोन दिवसापूर्वी केली होती. यासंदर्भात आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, आमची युती  एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांच्याशी चर्चा करून झाली होती. ओवेसी स्वत: विषयावर भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आमची युती कायम असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

सध्या राज्य सरकारची संपूर्ण तिजोरी रिकामी झाली असून दारूडय़ाप्रमाणे सरकारने गडकिल्ले विकायला काढले आहेत. आमची रॅली सत्ता परिवर्तनाची आहे. आम्ही सत्तेत आल्यास काय करणार हे या रॅलीच्या माध्यमातून सांगणार आहे. सत्ता मिळाल्यास मंदीवर मात करू शकतो आणि त्याची किल्ली आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.