काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती पहिल्यांदाच संघ व्यासपीठावर

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जून २०१८ मधील तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित होते. यामुळे हा कार्यक्रम संघाच्या दृष्टीने लक्षवेधी ठरला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती संघ व्यासपीठावर प्रथमच आल्याने यावरून त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. यावेळी  डॉ. प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या विविध सेवाकार्याची माहिती घेतली होती. तसेच कोठी रोड येथील आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

नागपुरात दरवर्षी संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन होते. या वर्गात देशभरातील स्वयंसेवक सहभागी होतात. २०१८ मध्ये या वर्गाच्या समारोपाला  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार असल्याने हा विषय बराच गाजला होता. देशभरातील माध्यमांचे तसेच काँग्रेस, भाजप आणि संघपरिवारासह सर्वच पक्षांचे ते या कार्यक्रमात नेमके काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. कार्यक्रमात प्रणवदांच्या समारोपाच्या भाषणानंतरही बरीच चर्चा झाली होती.

प्रणवदांच्या भेटीच्या निमित्ताने संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी सांगितले की, प्रणव मुखर्जी प्रथमच संघाच्या व्यासपीठावर आले होते पण त्यांना त्यापूर्वीच संघाच्या विविध कार्याची आणि विचारांची माहिती होती. संघाच्या विचाराने ते प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते. त्यांच्या नागपूर भेटीच्या निमित्ताने दोन दिवस त्यांचा सहवास लाभला होता. त्यांनी त्यावेळी संघाच्या सेवाकार्याची माहिती जाणून घेतली.  संघाच्या कामाची व्यापकता आणि संघाचे काम त्यांनी या निमित्ताने बघितले आणि प्रसन्न झाले होते. डॉ. हेडगेवार यांचे जीवनचरित्र बघून ते प्रभावित झाले होते, त्यामुळे त्यांनी कोठी रोड येथील डॉक्टरांचे निवासस्थान पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेथे भेट दिल्यावर ते डॉक्टरांचे कार्य बघून प्रभावित झाले होते. प्रणव मुखर्जी यांचे विचार वेगळे असले तरी डॉ. हेडगेवार यांच्याबद्दल आणि संघाच्या सेवाकार्याबाबत त्यांना आदर होता. ते नेहमीच सामान्य माणसांचा विचार करत होते.

नागपूरला येण्यापूर्वी दोन-तीन वर्षांपासून संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या ते संपर्कात होते आणि त्यांच्याशी ते संवाद साधत होते. संघ शिक्षा वर्गात त्यांनी स्वयंसेवकांनी केलेले योग आणि संघाची शिस्त बघून ते प्रभावित झाले होते. कार्यक्रमापूर्वी ते रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात आल्यावर त्यांनी आद्य सरसंघचालक  डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या कर्यक्रमाला त्यांच्यासह माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र सुनील शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अर्धेन्द्रु बोस, उद्योगपती सुनील मित्तल, विशाल मफतलाल आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका कार्यक्रमाचीही संस्मरणीय आठवण

महापालिकेचा सप्टेंबर २०१५ मध्ये शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षांचा समारोपीय कार्यक्रम मानकापूर येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहभागी झाले होते. महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त प्रकाशित करण्यात आले पुस्तकाचे प्रकाशन डॉ. प्रणव मुखर्जी यंच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी नागपूर नगरीचे तत्कालीन महापौर  प्रवीण दटके यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला तत्कालीन राज्यपाल  सी. विद्यासागरराव, तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कुशल प्रशासक होते. राष्ट्रहिताचा भाव त्यांच्या जीवनात होता. राजकीय क्षेत्रातील प्रत्येक नेत्याला आणि पक्षाला त्यांच्याबद्दल सन्मान होता. मितभाषी व लोकप्रिय असलेले प्रणव मुखर्जी यांच्या  निधनाने भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील रिक्त झालेले त्यांचे स्थान हे भरून निघणारे नाही. 

– डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

प्रणव मुखर्जी यांचे निधन देशासाठी धक्कादायक आहे. एका सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. देशाचे ते ऐतिहासिक आणि असे राजकीय नेते होते की, जी भूमिका त्यांना वेळोवेळी मिळाली.ती त्यांनी कर्तव्य म्हणून उत्तमप्रकारे पार पाडली. ते अर्थमंत्री असताना अनेकदा मला त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. सकारात्मक दृष्टीने त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले.  देशाच्या लोकशाहीतील त्यांचे योगदान कधी विसरता येणार नाही.

– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

एक कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांच्या कर्तृत्वाला हा देश कायम आठवणीत ठेवेल. गेल्या पाच दशकांपासून देशपातळीवर त्यांनी नेतृत्व केले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले.अफाट वाचन आणि परिस्थितीचे योग्य निरीक्षण करण्याची त्यांची क्षमता देशाच्या राजकारणात त्यांना कायम केंद्रस्थानी राहण्यास पूरक ठरली.

डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री