19 February 2019

News Flash

वृक्ष लागवडीत पारदर्शकता आणण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून वनखाते ही मोहीम पारदर्शीपणे राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.

यशाची टक्केवारी जनतेपर्यंत पोहोचवणार; अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांची लोकसत्ता कार्यालयाला भेट

नागपूर : देशभर चर्चेचा विषय ठरलेला राज्यातील वृक्षलागवडीचा कार्यक्रम अधिक विश्वासाष्टद्धr(३९र्) व्हावा, त्यात पारदर्शकता यावी तसेच या वृक्षारोपणाच्या यशाची टक्केवारी सामान्य जनतेला वेळोवेळी कळावी यासाठी यंदा हा कार्यक्रम राबवताना प्रथमच ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे अशी माहिती, माहिती तंत्रज्ञान व धोरण विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली. लोकसत्ताला दिलेल्या भेटीत त्यांनी वृक्षारोपणासह अत्याधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या वनखात्याच्या विविध पैलूंचा उलगडा केला.

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून वनखाते ही मोहीम पारदर्शीपणे राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मोहीम सुरू झाली तेव्हा साहाजिकच या विषयी अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, प्रत्येक मोहिमेगणिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही मोहीम अधिक पारदर्शी कशी करता येईल, यादृष्टीने वनखात्याने पावले टाकली. तिसऱ्या टप्प्यात ‘ड्रोन’चा वापर हे त्यापुढचे पाऊल असेल, असे प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले. आतापर्यंत मे आणि ऑक्टोबर महिन्यात वृक्षारोपणाचा आढावा घेतला जात होता. ड्रोनच्या वापरामुळे वृक्षारोपणाची ताजी माहिती जाणून घेता येईल. जगातील कोणत्याही देशात ४० ते ५० टक्क्यांच्या आसपास हरित आच्छादन आहे. आपल्याकडे केवळ २० टक्के हरितक्षेत्र आहे. ते वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ही मोहीम राबवली जात आहे.

राज्याच्या वनखात्यात पारदर्शकता यावी या हेतूने मुख्यालयी कमांड कंट्रोल रुम व जीआयएस कक्षाची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून राज्यातील वनक्षेत्र, वन्यप्राणी संरक्षण, वनजमिनीचे संरक्षण आणि सिमांकन कामाचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. तसेच डिजिटलाईज नकाशा वनखात्याकडे उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वी या मोहिमेसाठी ठोस यंत्रणा नव्हती, पण आता ती कार्यान्वित झाली आहे. ज्या पद्धतीने वृक्षारोपण मोहिमेचे नियोजन झाले आहे ते पाहता तिसऱ्या टप्प्यात १३ कोटीच नाही तर २०-२२ कोटीपर्यंत वृक्षारोपणाची आकडेवारी जाईल, असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

वृक्षारोपणाचे महत्त्व

जगात सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार जिल्हे आहेत. यातून आपली वाटचाल संकटांकडे होत चालल्याचे स्पष्ट होते. सुदैवाने शासन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संवेदनशिलता निर्माण केली आहे. महाराष्ट्रात ८४ हजार कोटी रुपये दारुवर खर्च केले जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर आठ-दहा तास राहून एक हजार कोटी रुपये खर्च होतात. त्यापेक्षा वृक्षलागवड करुन त्यावर खर्च केला तर ऑक्सिजन मिळेल. रुग्णालयात आयुष्याची लढाई लढताना कृत्रिम ऑक्सिजनसाठी किंमत मोजावी लागते. त्यापेक्षा वृक्षारोपण करुन ऑक्सिजनची निर्मिती केली तर रुग्णालयात जाण्याची वेळ येणार नाही.

First Published on May 19, 2018 2:49 am

Web Title: pravin shrivastav visited the loksatta office