गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचे धर्मादाय आयुक्तांना पत्र

नागपूर : महाठग प्रीती दासने लोकांकडून पैसे उकळण्यासाठी एक बनावट स्वयंसेवी संस्था निर्माण केली होती. या स्वयंसेवी संस्थेच्या नावावर तिने राजकीय पुढारी ते गर्भश्रीमंतांकडून लाखो रुपयांची देणगी मिळवल्याची माहिती तपासात समोर येत असून संस्थेच्या नावाने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पाचपावली पोलिसांनी सहधर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून संस्थेची नोंदणी आहे किंवा नाही, याची विचारणा केली आहे.

फेसबुवरून श्रीमंत सावज हेरून त्यांच्याभोवती लग्नाचा फाश टाकण्याचे काम प्रीती करायची. आतापर्यंत तिने अधिकृत चार लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका पीडित पुरुषाने पाचपावली पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक केली. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. ती पोलीस कोठडीत पोहोचताच शहरातील वेगवेगळया पोलीस ठाण्यात इतर तीन गुन्हे दाखल झाले. आता पाचपावली पोलीस तिच्याकडील पैशाचा शोध घेत आहेत. तपासादरम्यान तिने आधार अपंग विकास संस्थेच्या नावाने राजकीय पुढारी व दानदात्यांकडून लाखो रुपयांची देणगी घेतल्याचे समोर येत आहे. ही संस्था नोंदणीकृत नाही. शिवाय तिने संस्थेचे लेखा परीक्षणही केले नसल्याची शक्यता असून पोलीस याप्रकरणीही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी करीत आहेत. यासंदर्भात पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अनेक दिवस उलटूनही सहधर्मादाय आयुक्त कार्यालयातून उत्तर प्राप्त झाले नाही. उत्तर प्राप्त होताच योग्य ती कारवाई करण्यात येईल. संस्था नोंदणीकृत नसल्यास पुन्हा एक गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

कोटक महिंद्रा बँकेलाही माहिती मागितली

प्रीती दासने अनेकांना लाखो रुपयांनी गंडवले आहे. पण, तिच्या घराची झडती घेतली असता बँक खाते किंवा संपत्तीची कुठलीच माहिती मिळाली नाही. पण, एक खाते  कोटक महिंद्रा बँकेत असून त्याची माहिती पोलिसांना बाहेरून समजली आहे. या खात्याचे पासबुक, धनादेश किंवा इतर कोणतेच दस्तावेज प्रीतीकडे नसून ती माहिती सांगण्यास तयार नाही. शेवटी पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेलाच पत्र लिहून तिच्या नावाचे खाते आहे का व असल्यास त्याची सविस्तर माहिती पुरवण्यासाठी पत्र लिहिले आहे.