नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात एक गर्भवती अत्यवस्थ अवस्थेत आली. तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. आधीच गर्भवती, त्यातही जीव धोक्यात. डॉक्टरांनी हा धोका ओळखला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह निवासी डॉक्टरांनी धावपळ करून रक्ताच्या प्लेटलेटसह औषधांसाठी स्वत: पैसे गोळा केले व या महिलेवर उपचार झाले. आज गुरुवारी तिने बाळाला जन्म दिला. आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत.

रिता चौधरी (३०) रा. हिंगणा असे या महिलेचे नाव आहे. तिला दोन मुले आहेत. एकदा सिझर झालेल्या महिलेने पुढच्या प्रसूतीची जोखीम टाळण्यासाठी गर्भधारणेनंतर  विविध तपासण्या करणे आवश्यक असते.

उपचारादरम्यान संबंधित डॉक्टरांकडून गर्भवतीला टिटनेसची लसही दिली जाते, परंतु ही महिला एकदाही तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली नव्हती व लसही घेतली नव्हती.  प्रकृती खालावल्यावर  ती मेडिकलमध्ये दाखल झाली. तिचे हिमोग्लोबीन कमी झाले होते. रक्ताच्या इतर तपासणीत प्लेटलेट केवळ १८ हजार असल्याचेही निदान झाले. तिच्याकडे पैसे नव्हते. निवासी डॉक्टरांनी महागडी सिंगल डोनर प्लेटलेट स्वत: पैसे गोळा करून महिलेला दिले.

या कामासाठी स्त्रीरोग विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. फिदवी, सहाय्क प्राध्यापक डॉ. आशीष झरारिया यांनी घेतलेला  पुढाकार महत्त्वाचा होता.