• आईमुळे बाळांनाही आजार संभवतो
  • केंद्र राज्य शासनाचे दुर्लक्ष

गर्भवतींना हिरडय़ा वा दातांशी संबंधित आजार असल्यास तिच्या होणाऱ्या बाळालाही ते संभवतात. अमेरिका व युरोपमध्ये काळजी म्हणून या महिलांच्या दातांच्या तपासणीची सक्ती आहे. ती आवश्यक असतानाही केंद्र व राज्य शासनाचे याकडे लक्ष नाही. मुंबई, दिल्लीसह काही मोठय़ा शहरांत खासगी रुग्णालयांत ही सोय असली तरी नागपूरच्या खासगी वैद्यकीय क्षेत्राचेही याकडे लक्ष नसून शहरातील महिलांना याप्रसंगी दंत तपासणीचे महत्त्वही माहिती नसल्याचे अभ्यासात पुढे आले आहे.

नागपूरसह देशाच्या विविध भागात झालेल्या अभ्यासात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तब्बल ६० ते ६५ टक्के नागरिकांमध्ये दातांशी संबंधित विविध आजार वा संसर्ग आढळले आहे. या रुग्णांमध्ये गर्भवती संवर्गातील महिलांचीही संख्या मोठी आहे. दंतरोग तज्ज्ञांच्या विविध संघटनेसह विविध सामाजिक संघटनांकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या दंतरोगाशी संबंधित जनजागृती अभियानानंतरही या रुग्णांमध्ये हव्या त्या प्रमाणात कमी झाली नाही. नागपूरसह विविध भागात झालेल्या गर्भवतींच्या दाताशी संबंधित संशोधनात या महिलेला दात वा हिरडय़ांशी संबंधित आजार असल्यास व त्याकडे दुर्लक्ष झाल्यास होणाऱ्या बाळावरही वाईट परिणाम संभवत असल्याचे पुढे आले आहे.

पाश्चिमात्य देशात हा धोका बघता वैद्यकीय प्रोटोकॉल म्हणून प्रत्येक महिला गर्भवती झाल्यावर त्यांच्या दातांची नित्याने सक्तीने तपासणी केली जाते. या महिलेसह तिच्या होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होऊ नये, हा त्यामागचा सरकारचा हेतू आहे. याप्रसंगी संबंधित महिलेची तपासणी करताना तिला दातांची काळजी घेण्याबाबत व होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होऊ नये म्हणूनही मार्गदर्शन केले जाते, परंतु भारतात केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे अद्यापही याकडे लक्ष नाही. देशातील एकाही शासकीय रुग्णालयात अद्याप गर्भवती महिलांच्या दंत तपासणीची स्वतंत्र सोय शासनाने केली नाही. दिल्ली, मुंबई, हैदराबादसह काही मोठय़ा शहरांमध्ये खासगी रुग्णालयांनी स्वत:हून गर्भवती महिलांच्या दाताच्या काळजीबाबत व्यवस्था केली आहे.

नागपूरसह विदर्भातील एकाही खासगी वैद्यकीय क्षेत्राकडून याकरिता पुढाकार घेतला नसल्याने येथे सुविधा तर सोडाच महिलांनाही दंत तपासणीच्या आवश्यकतेबाबत माहिती नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये नागरिकांमध्ये असलेल्या दाताच्या विविध आजारांबाबतची जनजागृती, तेथील आरोग्य विम्यात दंत विम्याचाही समावेश असण्यासह इतर कारणांनी गर्भवती महिलाही स्वत:हून दाताच्या तपासणीकरिता जातात. भारतात अद्यापही दाताच्या विम्याला प्रतिसाद नसून हा खर्च गरिबांसह मध्यमवर्गीयांना झेपत नाही. सोबत शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलांकरिता स्वतंत्र सोय व मार्गदर्शनाची व्यवस्था नसल्याने या संवर्गातील महिलांना दंत तपासणीचे महत्त्वच माहिती नाही. तेव्हा या महिलांना शहरातील शासकीय व खासगी संस्थांकडून न्याय कधी मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वैद्यकीय क्षेत्राच्या नियमानुसार प्रत्येक गर्भवती महिलेने नित्याने हिरडय़ांसह दंत तपासणी व तज्ज्ञ दंतरोग तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची गरज आहे. पाश्चिमात्य देशात हा प्रकार पाळला जात असला तरी नागपूरसह भारतात अद्याप त्याची फारशी अंमलबजावणी होत नाही. शहरात महिलांना याबाबत माहितीही नसल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. नागपूरसह सगळ्याच भागातील प्रत्येक शासकीय व खासगी संस्थांमध्ये याकरिता स्वतंत्र व्यवस्था व मार्गदर्शन केंद्र झाल्यास मुलांना या आजारापासून वाचवणे शक्य होईल.

डॉ. तपस्या कारेमोरे, सहयोगी प्राध्यापक, व्हीएसपीएम दंत महाविद्यालय, नागपूर