विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानकाचा समावेश
नागपूर शहरातील पाच महत्त्वाच्या भागातून ‘प्रीपेड’ ऑटोरिक्षा सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे, परंतु शहरातील सध्याच्या ऑटोरिक्षांच्या प्रवास भाडय़ांच्या तुलनेत शहरात धावणाऱ्या वातानुकूलित ऑनलाईन टॅक्सीचे दर कमी असल्याने या रिक्षांना कसा प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता आहे. या नव्या योजनेमुळे नागपूरला वेगवेगळ्या कामाकरिता बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची प्रवास भाडय़ातून होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे.
शहरातील मिहान, एमआयडीसी, बुटीबोरीसह वेगवेगळ्या भागात औद्योगिक विकासाचा वेग वाढत असून अनेकांना रोजगारही उपलब्ध होत आहे. तेव्हा ग्रामीण भागातून येथे स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. नागपूरला केंद्र व राज्य शासनाची अनेक कार्यालये, शैक्षणिक संस्था असल्याने कर्मचारी व विद्यार्थीही देशाच्या वेगवेगळ्या भागातून येथे शिक्षण घेण्याकरिता येतात. नागपूरचे वाढणारे महत्त्व बघता गेल्या काही वर्षांपासून शहरात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तराच्या ऑनलाईन बुकिंग टॅक्सी सेवा सुरू झाली आहे.
या कंपन्यांमधील स्पर्धेमुळे शहरात सध्या या सेवेचे दर फार कमी आहेत हल्लीचे दर बघता ऑटोरिक्षाकडून मीटरप्रमाणे आकारण्यात येणाऱ्या भाडय़ाहूनही या वातानुकूलित टॅक्सी स्वस्त असल्याचे चित्र दिसते. तेव्हा नागरिकांकडूनही या सेवेला मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळते आहे. या सेवेमुळे ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांच्या संघटनांकडून ही सेवा अनधिकृत असून त्याला बंद करण्याकरिताही वेळेवेळी आंदोलने होतांना दिसतात. प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहराच्या वतीने नुकतेच शहरातील नागपूर रेल्वेस्थानकाच्या दोन्ही द्वार, नागपूर विमानतळ, नागपूरचे गणेशपेठ बसस्थानक, अजनी रेल्वेस्थानक अशा पाच भागातून प्रिपेड ऑटोरिक्षा सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सेवा देण्याकरिता सामाजिक संस्थांकरिता निविदा प्रक्रियाही जवळपास पूर्ण झाली आहे. या संस्थांना ही सेवा देतांना ज्या ऑटोरिक्षाला प्रवासी मिळवून दिले त्यातील प्रवाशांकडून काही रुपये सेवा शुल्क घ्यायचे आहे. तेव्हा प्रवाशांना आधीच ऑटोरिक्षांच्या जास्त प्रवास भाडय़ासह सेवा शुल्काच्या नावाने अतिरिक्त भरूदड सहन करावा लागण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. तेव्हा ही योजना नागपूर शहरात कितपत यशस्वी ठरेल? याबाबत शहरातील परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करीत आहेत. ऑटोरिक्षा चालकांच्या संघटनांकडून मात्र या सेवेमुळे परिवहन व्यवस्थेत सुसूत्रता येऊन प्रवाशांना चांगली सेवा मिळणे शक्य असल्याचाही दावा केला जात आहे.

नागपूर शहरात प्रिपेड ऑटोरिक्षा सेवा सुरू झाल्यास बाहेरून वेगवेगळ्या कामाकरिता येणाऱ्या प्रवाशांची प्रवास भाडय़ातून होणारी लूट थांबण्यास मदत होईल. सोबत प्रवाशांनाही चांगल्या सेवा मिळतील. ऑटोरिक्षा चालकांनाही या पाच ठिकाणांहून त्वरित प्रवासी मिळणार असल्याने त्यातून त्यांनाही आर्थिक लाभ होईल.
रवींद्र भुयार,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर</strong>