शतकाच्या उंबरठ्यावरील वि. सा. संघाच्या अध्यक्षांची व्यथा; इतर सदस्यांना मात्र वयाचे कारण सांगून निरोपाचे नारळ

नागपूर : मी थकलोय, माझ्याने आता होत नाही. यापूर्वी दोनवेळा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला. पण ‘कार्यकारिणी’च मला सोडायला तयार नाही, अशा शब्दात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी आपली व्यथा लोकसत्ताकडे व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघाच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांना वयाचे कारण सांगून निरोपाचे नारळ दिले जात असताना वयाचा हाच निकष अध्यक्षांना का लागू होत नाही, अशी चर्चा सध्या वैदर्भीय साहित्य वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर म्हैसाळकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कार्यकारिणीतील कुठल्याही ज्येष्ठ सदस्याला जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आलेले नाही. पुढच्या वर्षी साहित्य संघाचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे वेगळी समिती स्थापन करणार आहोत. त्यात कार्यकारिणीत नसलेल्या आणि काही नवीन सदस्यांचा समावेश असणार आहे. माझ्याने आता होत नाही. मी थकलोय. पण शतकमहोत्सवी वर्ष असल्यामुळे मी कार्यकारिणीत आहेत. यापूर्वी दोनवेळा मी अध्यक्ष म्हणून मला ठेवू नका, असे कार्यकारिणीला निक्षूण सांगितले. नामधारी अध्यक्ष म्हणून पदावर राहणे मला आवडत नाही. त्यामुळे यापूर्वी मी दोन वेळा राजीनामा देण्याबाबत आपला निर्णय कार्यकारिणीला कळवला. पण,कार्यकारिणीतील सदस्यांनी माझा प्रस्तावच मंजूर केला नाही. म्हणून मी कार्यकारिणीत आहे, अशा शब्दात म्हैसाळकरांनी त्यांच्यावरील वयाच्या आक्षेपांचा समाचार घेतला.
विशेष म्हणजे, मागच्या १० वर्षांपासून म्हैसाळकर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठीही तेच अध्यक्ष होतील, असे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. म्हैसाळकरांनी वयाची पंचाहत्तरी पार केलेली आहे. तरीही ते साहित्य संघाचे नेतृत्व एखाद्या तरुण, उमद्या, धडपड्या व्यक्तीकडे न सोपवता स्वत: त्या पदाला चिकटून बसले आहेत, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच होत असते. पण, मागच्या दहा वर्षांत त्यांनी या टीकेला कधी गंभीरतेने घेतले नाही. परंतु आता वि. सा. संघ आपला शतकी प्रवास पूर्ण करीत असताना या प्रवासातील महत्त्वाचे शिलेदार ठरलेले डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रकाश एदलाबादकर, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, शुभदा फडणवीस, डॉ. पद्मारेखा धनकर, बाबाराव मुसळे, राजश्री धामोरीकर, नरेंद्र लांजेवार, नरेश सबजीवाले, डॉ. अरुंधती वैद्य यांना कार्यकारिणीतून नारळ दिले जाणार असल्याचे वृत्त बाहेर आल्यानंतर पुन्हा अध्यक्ष होऊ पाहणाऱ्या म्हैसाळकरांच्या वयाबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
विरोध मोडून काढण्यासाठीच…
म्हैसाळकर यांच्या विरोधात एक विशिष्ट गट गेल्या काही वर्षांपासून कठोर भूमिका घेत असल्यामुळे त्या गटातील सदस्यांना ज्येष्ठत्वाचे कारण देत बाजूला केले जात असल्याची चर्चा साहित्य वतुर्ळात सुरू आहे. जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ ३१ मार्चपर्यंत आहे. त्याआधी नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. २२ पदांसाठी तंतोतंत २२ जणांचेच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, असे संकेत त्या पदासाठी इच्छुक एका सदस्याने दिले आहेत. परंतु तो सदस्यही आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अर्थात ही शंकाही म्हैसाळकरांच्या पद टिकवण्याच्या ‘विशेष कौशल्या’तून जन्माला आल्याची चर्चा आहे.