बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांचे मत
निरोगी शहराकरिता प्रत्येक बालक सुदृढ असणे गरजेचे आहे. बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह त्याला सुदृढ बनवण्याकरिता प्रत्येकाने प्रतिबंध (प्रिव्हेंशन), लसीकरण (इम्युनायझेशन), संतुलित आहार (न्यूट्रिशीयन) या ‘पीन’ मंत्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मंत्राचा अवलंब केल्यास प्रथम शहर व त्यानंतर देश निरोगी होण्यास मदत होईल, असे मत नागपूरचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले. नागपूरच्या ‘लोकसत्ता’ कार्यालयात भेट दिली असता ते बोलत होते.
डॉ. गावंडे म्हणाले की, प्रिव्हेंशन (पी), लसीकरण (आय), न्यूट्रिशियन (एन) हा ‘पीन’ मंत्र बालकाच्या बदलत्या वयानुसार बदलतो. बाळ जन्मत:च प्रथम सहा महिने त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे या काळात वारंवार त्याला सर्दी, खोकला, अतिसार या कुपोषित करणाऱ्या आजारांची लागण होण्याची शक्यता जास्त असते. हे आजार झाल्यास बाळाची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्याला वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत इतरही आजार संभवतात. मंत्राच्या प्रतिबंध या पहिल्या सूत्रानुसार बाळ सहा महिन्यांचे होईस्तोवर त्याला बगिचा, मॉल, चित्रपटगृहासह गर्दीच्या ठिकाणी नेण्याचे प्रत्येकाने टाळण्याची गरज आहे. जेणेकरून त्याला आजाराची लागण होणार नाही व विनाकारण औषध द्यावे लागणार नाही. लसीकरण हे दुसरे सूत्रही महत्त्वाचे आहे. यामुळे बाळाची विविध आजाराशी लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. तिसऱ्या संतुलित आहाराच्या सूत्रानुसार प्रत्येक बाळाला वयाच्या सहा महिन्यापर्यंत आईचे दूधच देण्याची गरज आहे. या दुधातून बाळाला संतुलित आहार मिळावा म्हणून आईच्याही आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याकरिता प्रत्येक आईला दुपारी किमान ३० मिनिटे व रात्री किमान ६ तासांची चांगली झोप, ऋतूनुसार फळ, हिरव्या भाजीपाला, अंकुरित कडधान्ये, डाळ, दूध व दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात देण्याची गरज आहे. आईला कॅल्शियम, प्रोटीनयुक्त आहार मिळाल्यास ते दुधातून बाळालाही योग्य प्रमाणात मिळून त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी आईमध्येही इच्छाशक्ती व जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. बाळाला वयानुरूप वेगवेगळ्या लसी देण्याची नितांत गरज असून त्या सगळ्या शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयात मोफत वा माफक दरात उपलब्ध आहेत.