सोनं, चांदीच्या किंमती वाढल्या

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला यंदा बाजारात ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल सराफा व्यापारी संभ्रमात आहेत.

सोनं – चांदीच्या वाढलेल्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असून यंदा सर्वात महागडी अक्षय्य तृतीया असणार आहे. मात्र, सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी उलाढालीची अपेक्षा आहे.

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहक थांबून असतो.

शिवाय गृहप्रवेशासाठी हा मुहूर्त सर्वात चांगला मुहूर्त मानला जातो. मात्र, यंदा सोन्यासह चांदीही महागली असल्याने बाजारात ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल व्यापारी संभ्रमात आहेत. आज सोन्याचा भाव बत्तीस हजार शंभर रुपये प्रति दहा ग्रॅम असून चांदी चाळीस हजार तीनशे रुपये प्रति किलो गेली आहे. त्यामुळे सराफा बाजारात दरवर्षीप्रमाणे होणारी ग्राहकांची गर्दी कमी राहण्याची शक्यता आहे, परंतु या मुहूर्तासोबतच सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने थोडीफार ग्राहकांची आशा व्यापाऱ्यांना आहे. एकूणच बाजारपेठेची उलाढाल बऱ्यापैकी असू शकते. सराफा व्यापाऱ्यांनी या मुहूर्तासाठी विशेष दागिण्यांची शृंखला ग्राहकांसाठी आणली आहे. या मुहूर्तासाठी मंगळसूत्रे, नेकलेस, बांगडय़ा आणि गळ्यातील चेनची मोठी मागणी होत असते. ते लक्षात घेऊन व्यापारी सज्ज झाले आहेत. जवळपास पन्नास किलो सोन्याची खरेदी अपेक्षित आहे. मात्र, वाढलेल्या सोन्याच्या किंमतीमुळे शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांचा हिरमोड होऊ शकतो.

‘‘अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त साधत बहुतेक जण सोने खरेदी करतात. ही एक परंपराच आहे. मात्र, यंदा सोने महागल्याने सराफा बाजारात ग्राहकांचा ओघ कमी असेल असे वाटते, पण त्याचबरोबर लग्नसराईचा काळ सुरू असल्याने आम्हाला ग्राहकांची कमी जाणवणार नाही. ’’

      – पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष सुवर्णकार व्यापारी महासंघ