News Flash

विदर्भातील विद्यापीठांमध्ये प्राचार्य भरतीचे रॅकेट

जयंत जगताप यांची जुलै २००९ मध्ये ज्युपिटर शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी नियुक्ती झाली होती.

|| देवेश गोंडाणे

नागपूर, अमरावती, गोंडवाना विद्यापीठात नियम डावलून नियुक्त्या;- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातील काही संलग्नित महाविद्यालयांमध्ये बोगस प्राचार्य भरतीचे रॅकेट न्यायालयाच्या निकालाने समोर आले आहे. नागपूर विद्यापीठाने अनेक महाविद्यालयांमध्ये अपात्र प्राचार्याची नियुक्ती केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता अनेकांना नियमबा’ पद्धतीने सेवा वाढवून दिल्याचे उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने(यूजीसी) २०१३ ला प्राचार्यासाठी पाच वर्षांचा सेवाकाळ ठरवून दिला आहे, तर राज्य शासनानेही २०१६ मध्ये शासन निर्णयाद्वारे या निर्णयाची पुष्टी केली. त्यामुळे कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राचार्य नियुक्तीच्या दिनांकापासून पाच वर्षे सेवेत राहता येते. परंतु, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाला डावलत नागपूर, गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठाने प्राचार्याना सेवाकाळ वाढवून देत नियमाचा भंग केल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन दिवसाआधी राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय कुही येथील प्राचार्य जयंत जगताप यांच्या नियमबा’ सेवेविरोधात निर्णय दिला. तसेच नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी प्राचार्य जगताप यांची बेकायदेशीर आणि नियमांचा भंग करून सेवा वाढवून दिल्यामुळे डॉ. काणेंवर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत.

जयंत जगताप यांची जुलै २००९ मध्ये ज्युपिटर शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर मे २०१० मध्ये जगताप यांची विदर्भ आर्ट अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालय लाखनी येथे यूजीसीच्या नियमानुसार पाच वर्षांपर्यंत किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्राचार्य पदाच्या सेवेला मान्यता दिली. मात्र, त्यानंतर जगताप यांची पुन्हा राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय कुही येथे २०१३ ते २०१८ या पाच वर्षांसाठी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली. जगताप यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने संस्थेने नवीन प्राचार्य भरतीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे मागणी केली. मात्र, जगताप यांनी संस्थेला अंधारात ठेवत पाच वर्षांचा कार्यकाळ संपूनही विद्यापीठाकडे कार्यकाळ वाढवण्यासाठी अर्ज केला. यावर तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हे नियमात बसत नसल्याचा शेरा दिला होता. तरीही कुलगुरूंनी विशेषाधिकाराचा गैरवापर करीत जगताप यांना ६२ वर्षांपर्यंत सेवाकाळ वाढवून दिला. या नियमबा’ सेवा वाढीवर न्यायालयाने ताशेरे ओढत कुलगुरू काणेंनाही चांगलेच खडसावले आहे. मात्र, जगताप यांनी न्यायालयामध्ये गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठातील काही प्राचार्यानाही अशाच प्रकारे सेवाकाळ वाढवून देण्यात आल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांना डावलून नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठांमध्ये बोगस प्राचार्य नियुक्तीचे रॅकेट उघड झाले आहे.

नियमबा सेवा घेणारे प्राचार्य

गोंडवाना विद्यापीठातील महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूरचे शशिकांत आसुले, चिंतामणी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य चक्रधर निखारे, नागपूर विद्यापीठातील डी.बी. भोयर महाविद्यालय मौदा येथील डॉ. एस.व्ही. कुदळे, महिला कला महाविद्यालय उमरेडचे डॉ. श्याम पुंडे, अमरावती विद्यापीठातील सीताबाई कला महाविद्यालय अकोला येथील डॉ. आर.ई. सिकची आदींची नियमबा’ पद्धतीने सेवा वाढवून दिल्याचे समोर आले आहे.

प्राध्यापक नसतानाही प्राचार्य?

प्राचार्य अजित शृंगारपुरे, प्राचार्य खंडाईत यांच्या अपात्र नियुक्तीचे प्रकरण ताजे असतानाच गोंदिया येथील एका शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये प्राध्यापक नसूनही प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या एकंदर कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 2:30 am

Web Title: principal recruitment racket universities akp 94
Next Stories
1 लोकजागर : व्यवस्थेतील ‘खड्डय़ां’चे काय?
2 राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन
3 बांधकाम व्यावसायिकाची २३ लाखांनी फसवणूक
Just Now!
X