मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अखत्यारित असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदय आणि यकृत प्रत्यारोपण सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात यश मिळाल्यास भविष्यात शासकीय रुग्णालयांत गरिबांनाही प्रत्यारोपण करता येईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दिली. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉ. मित्रा म्हणाले, मेडिकल हे टर्शरी केअर सेंटर असून येथे अत्यवस्थ रुग्णांवरच उपचार व्हायला हवे, परंतु सध्या येथे सर्दी, खोकला, तापाचेही रुग्ण उपचारासाठी येतात. सार्वजनिक आरोग्य विभागासह महापालिकांच्या रुग्णालयांचे सक्षमीकरण झाल्यास हा भार कमी होऊ शकतो. त्यातच मेडिकल, सुपरवर सध्या विदर्भासह शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे चार ते पाच कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकसंख्येचा भार आहे. राज्य शासनाकडून उपलब्ध सोयी-सुविधेनुसार रुग्णांना चांगल्या सोयी दिल्या जात आहेत. सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू आहे. या आजपर्यंत योजनेसह इतर पद्धतीने येथे ४६ हून अधिक जणांवर प्रत्यारोपण झाले असून राज्यातील शासकीय रुग्णालयांतील हा उच्चांक आहे. सुपरला हृदय प्रत्यारोपण सुरू करण्यासाठी हार्ट फेल्युअर क्लिनिक सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात हृदय प्रत्यारोपणासाठी राज्यातील सुप्रसिद्ध या तज्ज्ञांची करारपद्धतीवर नियुक्ती केली जाईल. यकृत प्रत्यारोपणासाठी मेडिकलमधून उत्तीर्ण झालेल्या आणि सध्या देशातील यकृत प्रत्यारोपण क्षेत्रातील दिग्गजांमध्ये मोडणाऱ्या डॉ. मोहनका आणि डॉ. राहुल सक्सेना यांचीही मदत मिळण्याची आशा आहे. सोबतच मेडिकलमध्ये अस्थी बँक, रोबोटिक सर्जरी युनिट उभारण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. सजल मित्रा यांनी सांगितले.

अवयवदान वाढवण्यासाठी जलद पथक

मेडिकल, ट्रामा केयर सेंटर, सुपर स्पेशालिटी या रुग्णालयांत मोठय़ा संख्येने अत्यवस्थ रुग्ण उपचार घेतात. त्यातील काही मेंदूमृत होतात. या रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेशन केल्यास मोठय़ा संख्येने अवयवदान होणे शक्य आहे. त्यासाठी समुपदेशक वाढवले जातील. अवयवदान वाढल्यास प्रत्यारोपण वाढून अवयव निकामी झालेल्यांचे प्राण वाचू शकतील. सध्या ट्रामा केयर सेंटरमध्ये प्रा. डॉ. नरेश तिरपुडे यांच्या नेतृत्वात चमू कार्यान्वित आहे. परंतु मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान वाढवण्यासाठी त्यांचे अवयव जास्त काळ टिकवण्याची गरज आहे. त्यासाठी एक डॉक्टरांचे जलद पथक तयार केले जाईल. कुणी मेंदूमृत रुग्ण असल्याचे लक्षात येताच हे पथक त्यांचे अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.

कौशल्याधारित शिक्षणावर भर

मेडिकलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जाईल. एमबीबीएसला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षीपासूनच रुग्ण हाताळण्याचे कौशल्य व उपचाराबाबतचे तंत्र, रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांशी संवाद कौशल्य शिकवले जाईल. त्यासाठी प्रत्येक तीन महिन्यात वैद्यकीय शोध निबंधाची एक पुस्तक प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही डॉ. मित्रा म्हणाले.

रुग्णांना दाखल करण्याचा वेळ कमी करणार

मेडिकल, सुपर स्पेशालिटीच्या बाह्य़रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना प्रथम टोकन घेऊन नंतर शुल्क भरण्यासाठी गर्दी असल्यास जास्त कालावधी लागतो. त्यामुळे उपचाराला विलंब होतो. येथील व्यवस्थेत काही बदल करून काही बाह्य़स्रोतांकडून कर्मचारी घेत तातडीने टोकन व शुल्क घेऊन उपचाराची सोय केली जाईल. सोबत आकस्मिक अपघात विभागात रुग्ण आल्यास पाच मिनटांत त्याची कागदपत्रांसह दाखल्याची सोय केली जाईल, असेही डॉ. मित्रा यांनी सांगितले.

स्वायत्त झाल्यास अधिकार वाढतील

मेडिकलच्या आखत्यारित सुपर स्पेशालिटी रुग्णालय, ट्रामा केयर सेंटर, नर्सिग कॉलेज, व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार महाविद्यालयासह इतरही बरेच विभाग आहेत. येथे भविष्यात स्पाईन केअर सेंटर, लंग्स इन्स्टिटय़ूट, सिकलसेल एक्सलेंस सेंटर, स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयासह इतरही काही संस्था प्रस्तावित आहेत. त्यामुळे मेडिकलचा भविष्यात व्याप वाढणार आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वैद्यकीय सचिवांनीही व्हीएनआयटी आणि मोठय़ा संस्थांच्या धर्तीवर मेडिकललाही स्वायत्त संस्था म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार प्रशासन मार्गक्रमण करत असून ही संस्था स्वायत्त झाल्यास अधिकारात वाढ होऊन रुग्णांना लाभ होईल.

व्हायोलॉजी प्रयोगशाळा व संशोधनावर भर

मेडिकलमध्ये व्हायोलॉजीची प्रयोगशाळा सुरू करण्याचे काम सुरू आहे. ती तातडीने कार्यान्वित करून तेथे विविध संशोधनाला प्राधान्य दिले जाईल. या प्रयोगशाळेमुळे मेडिकलमध्ये स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूसह इतरही  सध्या न होणाऱ्या तपासण्या येथे उपलब्ध होणार आहेत.