शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांची ग्वाही; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छ भेट

विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागात सकारात्मक बदल घडवायचा आहे. सिंथेटिक ट्रॅक लवकर पूर्ण  करण्यासोबतच खेळाडूंच्या हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले जाणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. विशेष म्हणजे, डॉ. सूर्यवंशी हे स्वत: अ‍ॅथलिट असून त्यांनी १९८७ साली वार्सा (पोलंड) येथील विश्व क्रॉस कंट्री  स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

यावेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, संचालपदी रुजू झाल्यावर सर्वप्रथम विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.त्यानुसार विभागाची कार्यपद्धती अधिक सुलभ आणि गतिशील कशी करता येईल, यासाठी एक आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये खेळाडूंशी निगडित सर्व प्रश्न निकाली काढण्यास प्राधान्य दिले आहे. यामध्ये सर्वप्रथम विद्यापीठाच्या मदानावरील सिंथेटिक ट्रॅकचे काम पूर्ण करायचे आहे. तसेच सुभेदार सभागृहाशेजारी असलेल्या मदानावर नव्याने क्रीडा संकुल बांधण्यास मान्यता मिळाली असून त्यचेही काम लवकर सुरू करायचे आहे. तेथे खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा पुरवायच्या आहेत. दरवर्षी आंतर विद्यापीठ  स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर विद्यापीठाचा संघ तयारीला लागतो. मात्र यंदापासून निवडलेल्या संघासाठी विशेष शिबीर घेऊन त्यांच्यावर अधिक मेहनत घेतली जाणार आहे. महाराष्ट्र विद्यापीठ आंतर क्रीडा  स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपद पटकवण्यावर भर देण्यात आला आहे. शिवाय जागतिक विद्यापीठ  स्पर्धेत आपले खेळाडू जास्तीत जास्त जावे या दृष्टिकोनातून करू. नागपूर विद्यापीठांतर्गत जवळपास पाचशे महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांच्या प्राचार्याना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्नही निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. शिवाय  स्पर्धेसाठी बाहेर गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वेत आरक्षणाचा विषय गंभीर असून त्यावरही तोडगा काढण्यात येईल. खेळाडूंना  स्पर्धेसाठी प्रत्येकी २५० रुपये भत्ता मिळतो. मात्र, तो कमी असल्याने त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून खेळाडूंना ब्लेझर मिळालेले नाहीत. त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो ही प्रश्न निकाली निघेल. शिवाय खेळाडूंना स्पोर्ट मेडिसीन, फिझिओथेरीपिस्ट, सायकॉलॉजिस्ट मिळावे, यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यापीठाचे ४८ संघ आहेत. खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे.  स्पर्धेनंतर लगेच प्रमाणपत्र मिळेल याची सोय केली जाईल. प्राध्यपकांच्या कार्यशाळा आयोजित करून त्यांना अद्ययावत कार्यप्रणालीशी जोडले जाईल, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

डिजिटल प्रणालीवर भर 

अनेक विद्यापीठांमध्ये खेळाडूंच्या प्रवेशिका ऑनलाई पद्धतीने भरल्या जातात. मात्र, आपल्याकडे ती सुविधा नाही. त्यामुळे डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या सुविधेचा लाभ खेळाडूंना मिळेल. तसेच खेळाडूंना डिजिटल प्रणालीमार्फत  स्पर्धेचा निकाल देखील बघण्याची सुविधा पुरववली जाणार आहे.

खेळाडूंना रोजगाराची संधी

ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडा कोटय़ातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो याबाबत फारशी माहिती नसते. आपल्याकडे,आयकर विभाग,उत्पादन शुल्क विभाग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये क्रीडा कोटा असतो. तेथे नियमित जागा निघत असतात. त्यामुळे ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी खेळलेल्या खेळाडूंना जागा निघताच आम्ही माहिती पुरवणार आहोत, याकडेही डॉ. सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले.