17 December 2018

News Flash

मुलांच्या भेटीने कैद्यांचे अश्रू अनावर

जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने गुन्हा घडला की गुन्हेगाराला कारागृहात जावे लागते.

कारागृहात गळाभेटी दरम्यान मुलांशी हितगूज करताना कैदी

बालकदिनानिमित्त कारागृहात गळाभेट

जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने गुन्हा घडला की गुन्हेगाराला कारागृहात जावे लागते. मात्र, यामुळे कुटुंबाची फरफट होते. याचा सर्वाधिक फटका हा मुलांना बसतो. नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने १४ नोव्हेंबर या बाल दिनानिमित्त मंगळवारी कैद्यांना त्यांच्या मुलांच्या भेटीचा उपक्रम हाती घेतला. यात शंभरावर मुलांनी आईवडिलांची भेट घेतली. या भेटीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारागृहातील या आगळ्यावेगळ्या भेटीने कारागृहातील वातावरणच गहिवरले होते.

जीवनातील एका चुकीचे परिणाम किती भयावह असू शकतात, हे कारागृहाच्या भिंतीआड जगणारा कैदीच योग्यपणे सांगू शकेल. विविध गुन्ह्य़ांमध्ये शिक्षा झालेले, न्यायालयीन कोठडीतील बंदी वर्षांनुवर्षे कारागृहात खितपत पडलेले असतात.

त्यांची मुलांसोबत भेटही होत नाही. अनेकांचा जन्मच त्यांचे वडील कारागृहात गेल्यानंतर झालेला असतो. त्यामुळे त्यांनी वडिलाला बघितलेले नसते. शिवाय कारागृहाच्या मुलाखत कक्षातून भेटताना मुलांना स्पर्शही करता येत नाही. ही बाब जाणूनच कारागृह प्रशासनाने कैदी आणि त्यांच्या मुलांच्या गळाभेटीचा उपक्रम सुरू केला.

मंगळवारी बालदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ७६ कैद्यांनी नोंदणी केली होती. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैद्यांच्या १२६ मुलांनी हजेरी लावली.  सकाळी ११ वाजता सर्व मुलांना प्रार्थना सभागृहात सोडले.

त्या ठिकाणी कैदी आपल्या मुलांशी भेटले. काही कैदी अनेक वर्षांनी मुलांना भेटत होते. त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. अशीच स्थिती मुलांचीही होती. या गळाभेटीने संपूर्ण सभागृह गहिवरले होते. अनेक कैद्यांनी कारागृह कँटीनमधून मुलांना विविध प्रकारचे खाऊ घेऊन दिले.

मोठय़ा मंडळींची भेट मुलाखत कक्षात झाली. या उपक्रमाच्या यशाकरिता अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अविनाश गावीत, कारखाना व्यवस्थापक आर.आर. भोसले, कमलाकर मिराशे, व्ही.एच. रजनलवार, योगेश पाटील, संजीव हटवादे यांनी सहकार्य केले.

First Published on November 15, 2017 1:51 am

Web Title: prison meet their kids on occasion of children day
टॅग Children Day