पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल; शासनाने लोकांना विश्वासात घ्यावे

राज्यातील सर्वसामान्यांसह उद्योगपती व इतरांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. या सगळ्यांनी काही समस्या असल्यास सुरक्षा मागण्यासाठी पोलिसांसह शासनाकडे जाणे अपेक्षित आहे, परंतु ते राज ठाकरेंसह इतरांकडे जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या सुरक्षेचा ठेका त्यांच्याकडे दिला आहे काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. विधानभवन परिसरात ते बोलत होते.

आगामी ‘रईस’ चित्रपटात एका पाकिस्तानी कलावंताने काम केले आहे. या चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रदर्शन होऊ देण्याबाबत अभिनेता शाहरुख खान यांनी राज ठाकरे यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्याची सध्याची स्थिती बघता चित्रपटसृष्टीसह सगळ्याच क्षेत्रांतील उद्योजक घाबरलेले आहेत. ते स्वत:ला सुरक्षा मिळावी म्हणून राज ठाकरेंसह इतर या लोकांकडे जातात. यावरून राज्यातील कायदा व सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतो. आघाडी सरकार असताना मुंबईत दंगे झाले होते. याप्रसंगी शासनाकडून पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले. पोलिसांनी आपल्या पद्धतीने हा प्रश्न हाताळून दंग्यावर नियंत्रण मिळवले. तेव्हा शासनाच्या व पोलिसांच्या चांगल्या कामगिरीमुळे सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली होती, परंतु या प्रकरणामुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून त्यावर शासनाचे नियंत्रण आहे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात असल्या व्यक्तींकडे जाणे ही चित्रपटसृष्टीसह विविध लोकांचीही चूक असून हा प्रकार थांबवण्याकरिता शासनाने या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्यासह त्यांच्या चित्रपटाला सुरक्षा देण्याची गरज आहे.

मराठा आरक्षणावर सरकारकडून राजकारण

मराठय़ांसह मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी फार जुनी आहे. आघाडी सरकारने हा प्रश्न सोडवण्याकरिता मराठा आरक्षणावर नारायण राणे यांची समिती तयार करून राज्याच्या विविध भागांत अभ्यास केला. न्यायालयीन आदेशानुसार आकडे सादर केल्यावर आरक्षणाबाबतचा अध्यादेश निघाला. काही जण न्यायालयात गेल्यावर त्याला स्थगिती मिळाली असली तरी देवेंद्र फडणवीस सरकारने त्वरित न्यायालयात जाऊन ही माहिती पुन्हा मांडून प्रसंगी नव्याने सुधारित अध्यादेश काढण्याची तयारी दर्शवण्याची गरज होती, परंतु तसे न झाल्याने हा प्रश्न दोन ते अडीच वर्षे पडून राहिला. न्यायालयात या सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर कले असे दाखवले जात असले तरी या सरकारकडून या विषयावर केवळ राजकारण केले जात असल्याचे दिसते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राज ठाकरे व अभिनेता शाहरुख खान यांची भेट दोन खासगी व्यक्तींमधील आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाच्या सुरक्षिततेबाबत काही मागणी शासनाकडे आल्यास निश्चित ती गांभीर्याने पूर्ण केली जाईल. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला सुरक्षा देण्याची जबाबदारी शासनाची आहे. या प्रकरणात विरोधक केवळ राजकारण करत आहेत.

अ‍ॅड. आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष