अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये तीन टक्के आरक्षण असूनही त्याची अंमलबजावणी नाममात्र होतान दिसून येते. मात्र, त्याचवेळी खासगी कंपन्यांमध्ये त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून एमबीए किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्यांना जेवढे पॅकेज मिळते तेवढेच पॅकेज या विद्यार्थ्यांना मिळत असल्याने या विशेष विद्यार्थ्यांना खासगी कंपन्या वरदान ठरत आहेत.

डोळस व्यक्तीला दिले जाणारे कौशल्य अपंगांनाही दिल्यानंतर त्यांना सुद्धा नोकऱ्यांच्या चांगल्या संधी उपलब्ध होत असल्याचे ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेने दाखवून दिले आहे. सध्या ही संस्था नागपुरातच म्युर मेमोरिअल रुग्णालयात अपंगांना निवासी स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचा जीवनस्तर उंचावण्यास मदत करीत आहे. उत्तम आणि कंपन्यांमध्ये आवश्यक कौशल्य प्रशिक्षण लाभल्याने  तब्बल ८३ विद्यार्थ्यांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय कंपन्यांकडून मागणीही वाढली आहे. लोककल्याणकारी राज्यात शासनाने दयाळू वृत्तीने विशेष विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना प्राधान्याने शिक्षण, प्रशिक्षण, नोकऱ्या उपलब्ध करून जगणे सुसह्य़ करण्याची गरज असताना शासन ज्या विशेष मुलांकडे दुर्लक्ष करीत आहेत तीच विशेष मुले खासगी कंपन्यांमध्ये मात्र, त्यांची वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहेत.

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि संसदेने नेहमीच विशेष मुलांच्या जीवनमानावर चिंता व्यक्त करून त्यांच्या विकासावर भर दिला आहे. त्यासाठी संसदेने कितीतरी कायदे केले आहेत. मात्र विशेष मुलांचा शिक्षण, प्रशिक्षण आणि नोकऱ्यांमधील वाटा नाममात्र आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकडेवारीनुसार केवळ दोन टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. या दोन टक्के विशेष विद्यार्थीही सरकारी नोकरीत सामावून घेतले जात नाहीत. मात्र, गेल्या वर्षभरात खासगी क्षेत्रातील नागपूरचे टीसीएस, पुणे व्हाल्वो, जाम येथील पीव्ही टेक्सटाईल्स, नागपूरचे जोग सेंटर, नागपूरचे हुंडाई सव्‍‌र्हिस सेंटर, होटेल हेरिटेज, मूकबधिर शाळा, नागपुरातील होटेल ला मेरिडियन, नागपुरातील रिटेल क्षेत्र आणि हैदराबाद येथील वुडप्ले अशा नागपूर आणि बाहेरही मुलांची नोकऱ्यांसाठी निवड झाली आहे.

‘विशेष मुलांना रोजगार आणि कौशल्य संवर्धन’ या प्रकल्पांतर्गत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था मुलांना प्रशिक्षण देत आहे. याकामी पॉल हॅमनिंग फाउंडेशन आणि हैदराबादची युथ फॉर जॉब या दोन कंपन्यांची त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यात येते. मुलांना मिळणारे पॅकेजही सामान्य मुलांबरोबरचीच आहेत. सुरुवात पाच हजारांपासून असून त्यांना काहींना दोन महिन्यांचे तर काहींचा एक वर्षांचा उमेदवारीचा काळ संपल्यानंतर १० ते १६ हजारापर्यंत त्यांना पगार मिळणार आहे. अभियांत्रिकी पदविका प्राप्त कोणताही सामान्य विद्यार्थी आजच्या घडिला एवढेच कमावतो आहे.

सामान्य मुलांनाही कौशल्याची गरज असतेच तशीच विशेष मुलांनाही दिल्यास त्यांनाही चांगल्या संधी उपलब्ध होतात. मुख्यत्वे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, आवश्यक संगणकाचे ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे इंग्रजीची तयारी करून घेतली जाते. ज्या कंपन्यांनी परिसर मुलाखतीतून अशा विद्यार्थ्यांची निवड केली आहे, त्या कंपन्या पुन्हा या मुलांची मागणी करीत आहेत. आतापर्यंत एकूण ८५ विशेष मुलांना राज्यात आणि राज्याबाहेरही नोकरी मिळाली आहे.

– डॉ. सतीश गोगुलवार ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’चे संचालक