साठ वर्षीय अत्यवस्थ रुग्णाची संपूर्ण रात्र रुग्णवाहिकेत; ३७ रुग्णालयांच्या ४२ डॉक्टरांशी संपर्क साधूनही मदत नाही

नागपूर : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठवलेल्या साठ वर्षीय करोना रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेत प्रथम अकोल्याच्या खासगी रुग्णालयात खाटा नसल्याचे सांगत प्रवेश नकारला गेला. त्यानंतर  नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयानेही हात वर केले. दरम्यान, संपूर्ण रात्र रुग्ण रुग्णवाहिकेत ताटकळत राहिला. शेवटी मेडिकलच्या कोविड रुग्णालयात त्याची सोय झाली.

दुचाकीवरून पडल्याने  या रुग्णाला  अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्याला करोनाचे निदान झाले. रुग्णाचा मुलगा मदत मागायला आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे गेला. मिटकरी यांनीही रविवारी अकोलातील दोन्ही मोठय़ा खासगी रुग्णालयाशी संपर्क साधला. परंतु खाट नसल्याचे उत्तर मिळाले. एका डॉक्टरने नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयाशी संपर्क साधत तेथे खाट उपलब्ध असून रुग्णाला हलवण्याचा सल्ला दिला. त्यावर  मिटकरी यांनी कार्डियाक रुग्णवाहिकेची सोय करत रविवारच्या रात्रीच रुग्णाला नागपूरला हलवले. मध्यरात्री अडीच वाजता रुग्ण वोक्हार्टला पोहचल्यावर येथे खाट नसल्याचे सांगण्यात आले.

ऑक्सिजनवरील रुग्णाला आतही घ्यायला तयार नव्हते.  मिटकरी यांना कळल्यावर त्यांनी  लता मंगेशकर, किज्सवे, ऑरेंज सिटी, एलेक्सिस, होप, ७ स्टार  आणि इतर  ३७ हॉस्पिटलच्या ४२ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणीही प्रतिसाद दिला नाही.  दरम्यान मटकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्याशी संपर्क केला. सलील देशमुख यांनी तातडीने मेडिकलशी संपर्क करत रुग्णासाठी तेथे खाट उपलब्ध करून दिली. त्यांतर रुग्णाला  तेथे दाखल करण्यात आले. अशाप्रकारे आमदारांनाच अकोला व नागपूरच्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीचा प्रत्यक्ष अनुभव आला. याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर नाराजीही व्यक्त केली.

अत्यवस्थ बाधितांना खासगी रुग्णालये  बघायलाही तयार नसल्याचा कटू अनुभव मला आला.  दुसरीकडे खासगी डॉक्टर चक्क खोटे बोलून रुग्णांचा जीव धोक्यात आणत असल्याचे जाणवले.  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण शासन करोना नियंत्रणाचे प्रामाणिक प्रयत्न करत असताना खासगी रुग्णालयांमुळे शासनाची नाहक बदनामी होत आहे.

– अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस