*प्रवासी वाहतूक कोलमडली * रामटेक-नागपूर केवळ * एक एसटी धावली * बसस्थानक रिकामे, प्रवाशी परतले

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर जिल्ह्य़ात मंगळवारी सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णपणे कोलमडली. प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी त्यांच्या प्रवासी भाडय़ात दुप्पट, तिप्पट वाढ करून नागरिकांची लूट केली. जिल्ह्य़ात केवळ रामटेक- नागपूर- रामटेक ही एकच बस धावली असून तिही एका फेरीनंतर बंद पडली. दरम्यान, विविध बसस्थानकांवर संपामुळे प्रवाशांना आल्या पावली परतावे लागले.

ऐन दिवाळीत मंगळवारी ‘एसटी’तील विविध कामगार संघटनेच्या वेतन वाढीच्या मागणीवरून सुरू झालेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक- नागपूर- रामटेक वगळता एकही बस धावली नाही.

त्यातही या बसने एक फेरी पूर्ण केल्यावर त्यातील चालकाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे हा कर्मचारीही काम सोडून परतल्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व ५७० बसची चाके थांबल्याचे चित्र होते. आंदोलकांनी सकाळी गणेशपेठ बसस्थानकावर सुमारे ४ ते ५ बसगाडय़ांच्या टायरच्या हवा सोडत प्रवेशद्वारावर त्या आडव्या उभ्या केल्या. त्यामुळे येथे एकही बस आत येण्यासह बाहेर पडली नाही.

कामगारांनी विविध बसस्थानक व कार्यशाळेच्या बाहेर निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्या.

संपामुळे गणेशपेठ, मोरभवन, रामटेक, काटोल, उमरेड, सावनेर बसस्थानकांवर प्रवाशांना माहिती देणारे कर्मचारीही नव्हते, तर इतर १८ लहान बसस्थानकांचीही हीच स्थिती होती.  एसटीचे नियंत्रण कक्षही ठप्प पडल्यामुळे प्रशासनालाही संपाची पूर्ण माहिती मिळत नसल्याचे दृश्य होते. जिल्ह्य़ातील विविध बसस्थानकांवर एसटीने प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांना कोणताही पर्याय नसल्याचे बघत परतावे लागले. प्रवास अत्यावश्यक असलेल्या प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवासासाठी नेहमीच्या जादा प्रवास भाडे मोजावे लागले.

प्रवाशांच्या माहितीनुसार खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नागपूर- चंद्रपूर किंवा अमरावती दरम्यान प्रती प्रवासी सुमारे ५०० रुपये तर नागपूर- भंडारा दरम्यान सुमारे २५० च्या जवळपास प्रवास भाडे आकारून त्यांची लूट केली. अनुक्रमे हा दर १०० रुपये आणि १५० रुपयांच्या जवळपास असतो. दरम्यान, संपाचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभागाकडून जिल्ह्य़ातील खासगी बस, स्कूलबस आणि इतर सगळ्याच वाहनांना प्रवासी वाहतुकीची विशेष परवानगी देण्यात आली होती. सुमारे ८५०च्या जवळपास वाहने रस्त्यांवर उतरल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याचा दावा परिवहन विभागाकडून करण्यात आला.

४८ प्रवासी पुण्यात अडकले

मूळ विदर्भातील असलेल्या व सध्या विविध कामासाठी पुण्यात राहणाऱ्या ४८ प्रवाशांनी दिवाळी घरी साजरी करण्यासाठी एसटीचे आगाऊ आरक्षण केले होते, परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हे प्रवासी बसफेऱ्या बंद असल्यामुळे पुण्याला अडकून पडले आहेत.

संप काळात खासगी बसेसचा लाभ घ्यावा

प्रशासनाने नागपूर जिल्ह्य़ातील प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, बैद्यनाथ चौक, आग्याराम देवी चौक, सक्करदरा चौक, जगनाडे चौक, गोमती हॉटेल चौक, दिघोरी चौक, हरिहर मंदिर चौक, मोरभवन, म्हाडा कॉलनी, रविनगर, भरतनगर, बोले पेट्रोल पंप, काटोल नाका, कोराडी, वाडी नाका, एलआयसी चौक, इंदोरा चौक, ऑटोमोटिव्ह चौक, रहाटे कॉलनी, छत्रपती चौक, चिंचभवन खापरी, हिंगणा टी पॉईंट येथे खासगी बसेसला थांबे उपलब्ध करून दिले आहेत. या बसचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी भरारी पथक

प्रादेशिक परिवहन विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून २८० खासगी प्रवासी बसेस, ३२० स्कूल बस, २५० जीप आणि लहान संवर्गातील वाहने प्रवासी वाहतुकीकरिता उपलब्ध केले आहेत. स्टारबसलाही जिल्ह्य़ाच्या सीमेपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाला काही भागात प्रवाशांकडून खासगी वाहतूकदारांनी जादा भाडे आकारल्याच्या तक्रारी मिळाल्या, परंतु लगेच तेथे आरटीओचे भरारी पथक पाठवून पोलिसांच्या मदतीने प्रकार थांबवला गेला. खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून अवास्तव भाडे आकारणे गैर आहे. तशी कुणी तक्रार केल्यास दोषी वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.

– शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)