08 March 2021

News Flash

खासगी शिकवणी वर्गाची दहा हजार कोटींची उलाढाल ठप्प

सात महिन्यांच्या टाळेबंदीने लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शिकवणी वर्गाचे अर्थकारण अडचणीत

(संग्रहित छायाचित्र)

देवेश गोंडाणे

जेईई, सीईटी, नीट अशा विविध प्रवेश परीक्षा, शासकीय पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या राज्यातील खासगी शिकवणी वर्गाची किमान दहा हजार कोटींची उलाढाल टाळेबंदीमुळे ठप्प झाली आहे. सात महिन्यांच्या टाळेबंदीने लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शिकवणी वर्गाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. त्यामुळे राज्यातील पाच लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देणाऱ्या शिकवणी वर्गाना सामाजिक नियमांचे अंतर पाळून नियमित वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थी जेईई, सीईटी, नीट या प्रवेश परीक्षा देतात. सुमारे तीस लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देतात. त्याशिवाय सनदी लेखापाल, कंपनी सचिव असे अभ्यासक्रम करणारेही हजारो विद्यार्थी असतात. करोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने टाळेबंदी लागू केल्यामुळे शाळा महाविद्यालयांसह खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. मात्र, शाळा, महाविद्यालये बंद असली तरी स्पर्धा परीक्षा, जेईई, नीट यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षा या होणारच आहेत. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

राज्यात सुमारे एक लाख लहान व मध्यम शिकवणी वर्ग असून येथे पाच लाख लोक काम करतात. एकूण आर्थिक उलाढालीचा विचार करता सुमारे दहा हजार कोटींचे नुकसान झाल्याचे कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी सांगितले. तसेच शासकीय सेवेतील पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची राज्यातील संख्या काही लाखांच्या घरात आहे. स्पर्धा परीक्षांच्या राज्यभरातील एकूण शिकवणी वर्गाचा विचार करता एकटय़ा पुणे शहरात दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याचे भुयार यांनी सांगितले. शिकवणी वर्गावर भाडय़ाच्या खोली, खाजगी वसगतिगृह, खानावळी, प्रतिलिपी केंद्र असे अनेक व्यवसाय अवलंबून आहेत. शिकवणी वर्ग बंद असल्याने हे व्यवसायही डबघाईला आले आहेत.

शिकवणी वर्गच का बंद?

एस.टी. पूर्ण क्षमतेने सुरू होऊन प्रवासी प्रवास करू शकतात. रेस्टारेंट, बार सुरू झाले, चित्रपटगृहेही सुरू होणार आहेत. शहरांमध्ये प्रचंड गर्दीमध्ये सर्वच व्यवहार सुरळीत सुरू आहेत. असे असताना शिकवणी वर्ग बंद का?  इतर व्यवसायाप्रामणे शिकवणी वर्ग हाही एक लघुउद्योग असून तो सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

शासनाने आता व्यवसाय आणि वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी.

– प्रा. बंडोपंत भुयार, सदस्य, खाजगी शिकवणी अधिनियमन समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:15 am

Web Title: private tuition class turnover stagnates at rs 10000 crore abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सहाशे विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका
2 तुम्ही फक्त हिंदूंचे राज्यपाल आहात काय?
3 गुन्हेगारी सोडून द्या, अन्यथा पोलिसी खाक्या दाखवू!
Just Now!
X