शहरातील तुटवडय़ावर उपाय; आरटीओकडून २५ खासगी वाहने ताब्यात

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : उपराजधानीत करोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने  रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या सूचनेवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सुमारे २५ खासगी कार संवर्गातील  वाहने ताब्यात घेत त्यात रचनात्मक बदल करून ते रुग्णवाहिका म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी १३ वाहने मंगळवारी उपलब्ध करण्याची तयारी सुरू होती.

रोज आढळणाऱ्या नवीन बाधितांपैकी सर्वाधिक सुमारे ७० ते ८० टक्के रुग्ण शहरातील आहेत. त्यात नागपूरच्या आरटीओ कार्यालयांकडे शहरी भागात २७० तर ग्रामीण भागात १६९ खासगी  ग्णवाहिकांची नोंद झाली. परंतु त्यातील निम्म्याहून अधिक रुग्णवाहिका  नादुरुस्त  आहेत. इतर रुग्णवाहिका इतरत्र सेवा देत आहेत.  शासकीय रुग्णवाहिकांना मर्यादा असल्याने शहरातील अत्यवस्थ बाधितांना हलवताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. रुग्णवाहिकेला  विलंब होत असल्याने रुग्णांचा जीवही जात आहे.

रुग्णवाहिकेचा तुटवडा बघता नागपूर महापालिकेने पत्र लिहून आरटीओ कार्यालयाला २५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यावरून आरटीओकडून शहरातील २५  वाहने ताब्यात घेण्यात आली. यापैकी १३ वाहने मंगळवारी जवळपास तयार झाल्याने ती महापालिकेच्या सूपूर्द करण्याची प्रक्रिया आरटीओकडून सुरू होती.  इतरही वाहने लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वीही सुमारे दीड महिन्यापूर्वी आरटीओकडून महापालिकेच्या विनंतीवरून सुमारे १२ खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत.  ग्रामीण भागासाठीही सुमारे १० रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

रुग्णांना फायदा

नवीन रचनात्मक बदल असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये स्ट्रेचरसाठी जास्त जागा केल्याने रुग्णांनाही फायदा होणार आहे. रुग्णवाहिकेत चांगली हवा मिळेल याचीही सोय केली जात आहे. या वाहन मालकाला १ हजार २०० ते १ हजार ७०० रुपयांच्या जवळपास भाडे दिले जाईल.

महापालिकेच्या विनंतीवरून  २५ खासगी वाहने रचनात्मक बदल करून रुग्णवाहिका म्हणून दिले जाणार आहेत. या वाहनधारकांना जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने निश्चित केलेले दैनिक शुल्क महापालिकेकडून अदा केले जाईल.

– दिनकर मनवर,  प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)