25 April 2019

News Flash

प्रियंका म्हणाल्या, लवकरच नागपुरात भेटू!

प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस पदाची सूत्रे आज बुधवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात स्वीकारली.

कार्यकर्त्यांसह प्रियंका गांधी.

काँग्रेसच्या दोन्ही गटांनी भेट घेतली

प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस पदाची सूत्रे आज बुधवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात स्वीकारली. त्यानंतर दिल्लीत तळ ठोकून असलेल्या नागपुरातील दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. अगदी काही मिनिटांच्या या भेटीत प्रियंका यांना नागपुरात येण्याचे आमंत्रण देण्यात आले. त्यावर प्रियंका गांधी यांनी उस्फूर्तपणे लवकरच नागपुरात भेटू, असे सांगितले.

शहरातील काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते आणि प्रमुख कार्यकर्ते कालपासून दिल्लीत आहेत. प्रियंका गांधी पदभार स्वीकारणार असल्याचे निमित्त साधून दोन्ही गटाने दिल्लीत प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन आपापली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला.

शहर काँग्रेसवर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या गटाचे वर्चस्व आहे. दुसऱ़्ा गटाचे नेते नितीन राऊत यांनी यांनी माजी खासदार गेव्ह आवारी,  माजी मंत्री अनीस अहमद, माजी आमदार अशोक धवड आणि पक्षातून निलंबित  सतीश चतुर्वेदी यांना  दिल्लीत बोलावले आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांनी  पक्षाच्या विविध न ेत्यांच्या भेटी घेतल्या.  प्रियंका गांधी यांनी नागपूर आणि सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देण्याचे निमंत्रण शहर काँग्रेसकडून देण्यात आले. त्यावर त्यांनी हसत हसत लवकरच नागपुरात भेटू असे म्हटले.

त्यानंतर  विकास ठाकरे, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार, विवेक निकोसे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.  शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाने आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, आशीष दुआ, नगमा यांची भेट घेतली. राऊत यांच्या गटातील महिला नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. तसेच या गटाने महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंग यांचीही भेट घेतली.

२० हजार कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी नागपुरात लवकरच बुथ पातळीवरच्या २० हजार कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शिबिरात मार्गदर्शन करावे व  सेवाग्राम येथील बापू कुटीला प्रियंका गांधी यांनी भेट द्यावी, अशी विनंती शहर काँग्रेसने त्यांना केली.

First Published on February 7, 2019 2:07 am

Web Title: priyanka said meet in nagpur soon